शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून जमीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:25 AM2019-06-28T11:25:15+5:302019-06-28T11:26:06+5:30
शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून निघोजमध्ये सव्वा चार गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुद्रांक
निघोज : शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून निघोजमध्ये सव्वा चार गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निघोज (ता.पारनेर) येथील शिवा महादू फुलमाळी याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेरचे दुय्यम निबंधक के. ई. निमसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निघोज येथील गट क्रमांक ९४० मध्ये आरोपी शिवा महादू फुलमाळी याने घर बांधणीसाठी दस्त क्रमांक ३६२८/२०१४ नुसार खरेदीखत केले. त्यासोबत शेतकरी पुरावा म्हणून जोडलेला गट क्रमांक २३२२ चा स्वत:च्या नावाचा बनावट सातबारा तयार करून नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ (अ) व (ब) चा भंग केला. त्यामुळे फुलमाळी याच्याविरूद्ध नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८३ नुसार कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एल. पाटील यांनी पारनेरच्या दुय्यम निबंधकांना दिला होता. निघोज येथील पवन परशुराम सातपुते यांच्या तक्रारीनंतर हे खरेदीखत बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुय्यम निबंधकांनी या खरेदी खताचे फेरफार रद्द केले. मात्र संबंधितावर कारवाई न झाल्याने पवन सातपुते यांनी राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एल पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पारनेरचे दुय्यम निबंधक निमसे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शिवा फुलमाळी याच्याविरूद्ध भादंवि ४२०,४६५,४६७,४६८,८२ (अ), २(ब)८३ नुसार गुन्हा दाखल झाला.