मढी, मायंबा यात्रेसाठी विकतचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 03:37 PM2019-03-24T15:37:56+5:302019-03-24T15:38:01+5:30
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे.
अनिल लगड
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रा व आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथील मच्छिंद्रनाथ उत्सवावर यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. राज्यातून यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी दोन्ही देवस्थानांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सव होळीपासून सुरू होतो. यामुळे यात्रेला सुरूवात झाली आहे. लाखो भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पैठणला नाथषष्ठीनिमित्त जाणाऱ्या असंख्य दिंड्या या मढी, मायंबा येथे मुक्कामी असतात. या दिंड्याची व्यवस्था देवस्थानांना करावी लागते. मढी गावाला देवस्थानने बांधलेल्या शेततळ्यातून व त्याखाली असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. परंतु यंदा उद्भव आटल्याने शेततळे कोरडे पडले आहे. मढी देवस्थानसाठी २००० मध्ये जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा पाईलाईन केली आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या योजनेतून कधीच पाणी आले नाही. त्यानंतर मढी गावासाठी वांबोरी चारीतून पाईपलाईन आणून पाणी पुरवठा योजना राबविली. परंतु तीही बंद पडली. या दोन्ही योजनांचा मढीला काहीच उपयोग झाला नाही. यंदा यात्रा उत्सव सुरू झाला असून भाविकांना पाणी पुरविण्यासाठी मढी देवस्थान ट्रस्टला मोठी कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थिती सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टची आहे. हे उंच डोंगरावर असल्याने तेथील सर्व उद्भव कोरडे पडले आहेत. येथील यात्रा उत्सव पाडव्याच्या (६ एप्रिल) दिवशी असतो. येथे पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री प्रत्येक भाविकांना स्रान करुनच समाधी दर्शन घ्यावे लागते. तेथेही दरवर्षी शेकडो टँकरने देवस्थानला पाणी पुरवठा करावा लागतो.
श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांचा यात्रौत्सवास तसेच मायंबा (सावरगाव,ता.आष्टी) राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यंदा दुष्काळामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांचे हाल पाहता दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी मदत केल्यास भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, यात शंका नाही.
यात्रेसाठी रोज पाच टँकरने पाणीपुरवठा
मढी यात्रेसाठी देवस्थानने गेल्या आठ दिवसात १५० ते २०० टँकरने पाणी पुरवठा केला आहे. जवळपास १५०० ते २२०० रुपयांना एक टँकर असे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या टँकरचे पाणी परिसरातील जवळपास ३५ ते ४० विहिरीत टाकले आहे. त्यातून गावाला व भाविकांना सध्या पाणी मिळत आहे. दूरवरुन आलेल्या भाविकांना मात्र विकतच्या पाण्याच्या बॉटलचा आधार घ्यावा लागत आहे. रोज टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.