महिनाभरापासून पिण्याचे पाणी विकत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:45 PM2019-05-10T12:45:28+5:302019-05-10T12:48:41+5:30
शहरातील मिलिंदनगर परिसरात (प्रभाग ४) तब्बल महिनाभरापासून नागरिकांवर पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे
अशोक निमोणकर
जामखेड : शहरातील मिलिंदनगर परिसरात (प्रभाग ४) तब्बल महिनाभरापासून नागरिकांवर पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपालिका प्रशासन, स्थानिक राजकीय पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे येथे पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधांचीही वाणवा आहे.
जामखेडला नगरपालिका झाल्यानंतर तरी मिलिंदनगर परिसराची स्थिती पालटेल अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती. मात्र तसे काहीच झाले नाही. येथील पायाभूत प्रश्न ‘जैसे थे’चे राहिले. या परिसरातील अनेक रस्ते अवघे पाच ते आठ फूट रुंदीचे आहेत. त्यातून केवळ एकच वाहन जाऊ शकते. समोरून दुसरे वाहन आले, तर दोन्ही वाहनाचालकांची मोठी कसरत होते. तब्बल महिनाभरापासून या भागात नळाद्वारे पाणी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठीचे पाणी विकतच (जार) घ्यावे लागत आहे. या प्रभागाला जोडणारा महत्त्वाचा भुतवडा रस्ता ते धर्मयोद्धा चौक रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. काम सुरू असताना जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचे रूपाली पारवे, सोनुबाई गायकवाड यांनी सांगितले.
नगरसेविका विद्या वाव्हळ या नगरपरिषदेच्या माध्यमातून एका टॅँकरने चार खेपा करून येथील नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र रस्ते अरुंद असल्याने अनेक नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे अनेक बांधकामांच्या साईट बंद असल्याने येथील नागरिकांना रोजगाराचीही वाणवा आहे.
दररोज टॅँकरच्या चार खेपा..
मिलिंदनगर परिसरात अरूंद रस्ते आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून या प्रभागात सिमेंट रस्ते व भूमिगत गटाराची कामे झाली आहेत. त्यामुळे परिसर बदलत आहे. प्रभागात दररोज टॅँकरच्या चार खेपाद्वारे पाणी दिले जाते, अशी माहिती नगरसेविका विद्या वाव्हळ यांनी दिली.
सिंगल फेज मिळालीच नाही..
दोन वर्षांपूर्वी सिंगल फेज कनेक्शन मिळावे यासाठी खांब व तार ओढली आहे. परंतु ठेकेदाराला बिल न मिळाल्यामुळे त्याने रोहित्रामध्ये कनेक्शन जोडले नाही. त्यामुळे दूरवर असणाऱ्या ‘थ्री फेज’मधून केबल टाकून कनेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो, असे सुदमती सदाफुले व बबन कांबळे यांनी सांगितले.