साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; काचा हटविल्याने समाधीला आता थेट स्पर्श करता येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:59 AM2022-11-10T09:59:21+5:302022-11-10T09:59:52+5:30
या अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते.
शिर्डी- शिर्डी भाविकांचे साईदर्शन आनंददायी व्हावे या शिर्डीकरांच्या पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले बुधवारी झालेल्या बैठकीनंतर तत्काळ काचा हटवून भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेणे सुरू करण्यात आले सामान्य भाविकांना साईसमाधीला हस्तस्पर्श करून दर्शन व द्वारकामाईत प्रवेश देण्याबरोबरच साईसंस्थानने अनेक क्रांतीकारी निर्णय घेतल्याची माहिती संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली.
शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना समाधी मंदिरातील समाधी पुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येणे-जाणेकरिता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सीईओ बानायत यांनी दिली.
आज शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी या मुद्दयासंदर्भात सीईओ बानायत यांची भेट घेतली यावेळी सीईओ बानायत व ग्रामस्थांमध्ये सौहार्द पुर्ण वातावरणात चर्चा होऊन अनेक विषय मार्गी लागले मंदिराची सुरक्षा व प्रशासनाचे कामकाज यांना बाधा न येऊ देता ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या होत्या, त्या मागण्या बानायत यांच्याकडून ताबडतोब मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्या टप्याटप्याने स्वीकारता येतील असे आश्वासनही बानायत यांनी सर्वपक्षीय ग्रामस्थांना दिले.
या अगोदर व्हीआयपींना काचा काढून दर्शन घेता येत होते सामान्य भाविकांना मात्र दुरून हात जोडूनच दर्शन घ्यावे लागत होते. यामुळे भाविकांना मानसिक समाधान मिळत नव्हते या मागण्या संदर्भात अनेक ग्रामस्थांचा तसेच भाविकांचाही साईसंस्थानकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता चार दिवसापूर्वी पंजाबात हत्या झालेले भाविक सुरेंद्रकुमार सुरी या मुद्द्यावर उच्च न्यायालयात जाणार होते आजच्या निर्णयांमुळे सामान्य भाविकांचे साईदर्शन आनंददायी होण्यास मदत होणार आहे.