एक हाक मुक्या जीवांसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:33+5:302021-05-05T04:33:33+5:30
सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास फिरकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत आहेत. एप्रिल महिन्यात पक्ष्यांना खाण्यासाठीही काही मिळत ...
सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास फिरकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत आहेत. एप्रिल महिन्यात पक्ष्यांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते; पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला. आणि त्यासाठी एकदंत गणेश मंडळाने एक हाक मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला.
यावेळी मंडळाने परिसरातील नागरिकांना टाकाऊ वस्तूपासून बनविलेले प्लास्टिकचे भांडे वाटप केले, तसेच मंडळाच्या वतीने परिसरात विविध ठिकाणी प्लास्टिकच्या डब्यात पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्याची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने या डब्यामध्ये दररोज पाणी आणि धान्य ठेवण्यात येणार आहे. २०० डबे परिसरात वाटण्यात आले आणि १०० डबे परिसरात विविध ठिकाणी, तसेच झाडांवर ठेवण्यात आले. ‘पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असा संदेश सोशल मीडियावर फिरतो; पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशू-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा-पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे यावेळी मंडळाने सांगितले. या उपक्रमास मंडळाचे श्रीकांत आडेप, भास्कर जिंदम, देवीदास सादूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
----------
फोटो मेल
०३एकदंत मंडळ
एकदंत गणेश मंदिर मंडळाने ‘एक हाक मुक्या जीवांच्या पाण्यासाठी’ हा उपक्रम राबविला असून, घराघरात पक्ष्यांना पाण्यासाठी डबे ठेवले आहेत.