दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन
By अण्णा नवथर | Published: February 14, 2024 03:19 PM2024-02-14T15:19:44+5:302024-02-14T15:20:33+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे.
अहमदनगर: मराठा नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून नगरमध्ये मराठा तरुणांनी बुधवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून मराठा समाजाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. अहमदनगर शहरातील मराठा तरुण माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी एकत्र आले. हाती भगवे झेंडे व डोक्यात एक मराठा लाख मराठा, असे लिहीलेल्या टोप्या परिधान करून तरुण रॅलीत सहभागी झाले होते. मराठा तरुणांनी सरकारविरोधात जाेरदार घोषणा देत पायी मुख्यबाजारपेठतून पायी रॅली काढून दुकाने बंदचे आवाहन केले. काही ठिकाणी दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. ही रॅली माळीवाडा, मुख्य बाजारपेठ, दिल्लीगेट, प्रोफेसर चौक, पाईपलाईन रोडवर पोहोचली. श्रीराम चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला आहे. यावेळी दुकानदारांनी बंदच्या आहवानाला प्रतिसाद देत दुकाने बंद केली.