माहिती पाहण्यासाठी कार्यालयात बोलाविले; कार्यालयातून मात्र, फाईलीच गायब
By अरुण वाघमोडे | Published: June 16, 2023 03:58 PM2023-06-16T15:58:02+5:302023-06-16T15:58:39+5:30
खोडसळपणा करत मला पत्र देऊन माहिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष बोलविण्यात आले होते.
अहमदनगर : नगर शहरात २०२० ते २०२४ या कालावधीत झालेल्या रस्त्यांच्या कामांसदर्भात काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे माहिती मागितली होती. याबाबत काळे यांना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना कागदपत्रे पाहण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. यावेळी मात्र आवश्यक त्या कागदपत्रांच्या फाईलच कार्यालयातून गायब असल्याचे समोर आले. याबाबत काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
याबाबत काळे यांनी मनपाच्या शहर अभियंत्यावर गंभर आरोप केले. ते म्हणाले मी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विहित नमुन्यात आवश्यक असणारी माहिती सुस्पष्टरित्या मागितली आहे. असे असताना देखील खोडसळपणा करत मला पत्र देऊन माहिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष बोलविण्यात आले होते. मात्र आवश्यक असणारी परिपूर्ण माहितीच मला उपलब्ध करून दिली गेली नाही. अनेक फाईली गायब आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर मला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की महत्त्वाच्या पाहिली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी आहेत. माहिती जाणीवपूर्वक दडवली जात आहे. २०२० ते २०२३ दरम्यानच्या अलीकडच्या काळात देखील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पळ काढला जात आहे. नगरकरांना खड्ड्यात घालून अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी, काही नगरसेवक मात्र मालामाल झाले आहेत. या भ्रष्टाचारांना तुरुंगात जावे लागेल. जनतेच्या वतीने ही लढाई काँग्रेस शेवटपर्यंत लढेल असे काळे यांनी सांगितले.