रेल्वेची आश्वासनांवर बोळवण : बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:46 AM2018-11-06T11:46:23+5:302018-11-06T11:46:27+5:30
बेलापूर-परळी या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांचीही आश्वासनांवर बोळवण केल्याचे उघड झाले आहे.
कुकाणा : बेलापूर-परळी या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांचीही आश्वासनांवर बोळवण केल्याचे उघड झाले आहे.
बेलापूर ते परळी मार्गे नेवासा, शेवगाव,गेवराई या रेल्वेमार्गाऐवजी शेवगावपुढे पाथर्डी,राजुरी,रायमोह, बीड या चुकीच्या मार्गाचे सर्वेक्षण करून न परवडणारा सर्वेक्षण अहवाल सादर केला होता. या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबर २०१७ ते ७ डिसेंबर या कालावधीत कुकाणा येथे आमरण उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी जून २०१८ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल रेल्वे मंडळास देऊ, असे लेखी दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनीही स्वत: लक्ष घालतो, असे लेखी दिले होते. जून २०१८ ची मुदत संपल्यानंतरही सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याची माहिती महाव्यवस्थापक कार्यालयातून मिळाल्याने कुकाणा येथील रितेश भंडारी, प्रकाश देशमुख, प्रभाकर खंडागळे, राधेश्याम बोरूडे यांनी २० आॅगस्ट २०१८ रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांनी या रेल्वे मार्गासाठी राज्याचा खर्चाचा वाटा उचलण्याचे पत्र आठ दिवसात केंद्र सरकारला देण्याचे आश्वासन दिले. अडीच महिने उलटूनही अद्यापही पत्र दिले नसल्याचे भंडारी यांनी सांगितले. आत्मदहनाच्या घटनेनंतर ७ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे येथे रेल्वेचे महाव्यवस्थापकांची नगर, पुणे जिल्ह्यातील खासदारांसमवेत बैठक झाली. या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता महाव्यवस्थापकांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल रेल्वे मंडळास पाठविण्याचे आश्वासन खा. लोखंडे यांना दिले. मुदत संपल्यानंतर भंडारी यांनी विचारणा केली असता सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याची लेखी माहिती मिळाली. त्यामुळे महाव्यवस्थापकांनी मुख्यमंत्र्यांसह खासदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
अनेक वर्षांपासून या मागार्बाबत लढा सुरू आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी व नगर दक्षिणच्या खासदारांंना जनता जाब विचारणार आहे. दिवाळीनंतर या रेल्वेमार्गासाठी पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. या आंदोलनात जनतेने रस्त्यावर उतरून सामील होण्याचे आवाहन रितेश भंडारी यांनी केले आहे.
जून २०१८ च्या मुदतीनंतर सप्टेंबर २०१८ ची मुदतवाढ घेतली. मात्र ती मुदत संपल्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. -रितेश भंडारी, कुकाणा, सचिव, रेल्वे सेवा संस्था, कुकाणा.