मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:50 PM2023-01-30T22:50:54+5:302023-01-30T22:57:18+5:30
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावला
अहमदनगर - राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात सर्वांचंच लक्ष लागलेल्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तांबे यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केलं. विशेष म्हणजे सत्यजित तांबेंविरुद्ध असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी थेट संगमनेर येथील मतदार केंद्रावर जाऊनच प्रचार केल्याचं दिसून आलं. यावेळी, निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी त्यांना रोखलं आणि तेथून दूर होण्यास सांगितलं.
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले. यावेळी, नाशिक मतदारसंघात आणि काँग्रेसमध्ये झालेल्या राजकारणाचाही उल्लेख त्यांनी केला. आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नव्हता, असा गौप्यस्फोटही तांबे यांनी केला. तर, महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रावर जाऊन प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
शुभांगी पाटील थेट मतदान केंद्रावर मतदानासाठी उभ्या असलेल्या मतदारांच्या रांगेत जाऊन हात जोडून प्रचार करताना दिसून येतात. त्याचवेळी, तेथील प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना येथे प्रचार करण्यास मनाई असल्याचं सांगितलं. शुभांगी पाटील यांनी मी फक्त हात जोडत असल्याचं म्हटलं. मात्र, अधिकाऱ्याने त्यांना अधिकार सांगत, दुसरीकडे जाण्याचे सूचवले. तसेच, ही ग्रामपंचायत निवडणूक नाही, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, आता सर्वांनाच २ फेब्रुवारी म्हणजेच निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
काय म्हणाले सत्यजित तांबे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नव्हता, असा गौप्यस्फोट केला. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मी अपक्ष उमेदवार आहे, भविष्यातही मी अपक्षच राहीन. मात्र, गेल्या काही दिवासंमध्ये माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतकी वर्षे काँग्रेस पक्षात असल्यामुळे या सगळ्यावर प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर दिले नाही. पण, मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ही माहिती चुकीची आहे. मी फॉर्म भरताना काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच अर्ज भरला होता. तीन वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे माझा फॉर्म अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गौप्यस्फोटच तांबे यांनी केला.