शेवगाव नगरपरिषदेची सभा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:03 PM2019-07-31T16:03:29+5:302019-07-31T16:04:23+5:30
शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेने मनमानी पद्धतीने घेतलेली मासिक सभा रद्द करून पुन्हा ही सभा घेण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेच्या २१ पैकी १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. नियमाप्रमाणे या सभेची कार्यक्रमपत्रिका(अजेंडा) किमान ७ दिवस अगोदर नगरसेवकांना देणे आवश्यक होते. परंतु तो केवळ एक दिवस अगोदर देण्यात आला. मात्र त्यावर ११ जुलै अशी तारीख दाखवण्यात आली.
१५ जुलै रोजी होणारी सभा नगराध्यक्ष यांनी वेळेअभावी सर्वानुमते तहकूब केली व पुन्हा २२ जुलै रोजी घेण्याचे ठरवले. मात्र मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी कोणालाही सूचना अथवा दूरध्वनी न करता परस्पर सात सदस्य बोलावून २० जुलै रोजी मनमानी पद्धतीने नेहमीच्या ठिकाणाऐवजी अन्यत्र सभा घेऊन सर्व विषयांना मंजुरी दिली.
सदर सभेमध्ये निधी संदर्भात व गावाच्या विकासाबाबत महत्वाची चर्चा होणे अपेक्षित असताना मनमानी पद्धतीने सभा घेऊन परस्पर निधी वाटप करण्यात आला आहे. अशा प्रकारे सभा घेणे हा सभागृहाचा अपमान असून सदर सभा रद्द करून सर्व सदस्यांसमोर फेर सभा बोलविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांच्यासह अरुण मुंडे, विजयमाला तिजोरे, विकास फलके, अजय बारस्कर, उमर शेख, शब्बीर शेख, भाऊसाहेब कोल्हे, वर्षा लिंगे, शारदा काथवटे, सुरेखा कुसळकर, यमुनाबाई ढोरकुले या नगरसेवकांच्या सह्या आहेत.