‘ट्रू व्होटर अॅप’ न वापरल्यास उमेदवारांची ‘घंटी’ वाजवणार :निवडणूक आयोग ठेकेदाराचे आक्षेपार्ह वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:17 PM2018-12-04T12:17:13+5:302018-12-04T12:17:27+5:30
उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘ट्रू व्होटर अॅप’चा वापर न केल्यास त्यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्य निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा यांनी नगरमध्ये केल्याने उमेदवार व अधिका-यांमध्ये
अहमदनगर : उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘ट्रू व्होटर अॅप’चा वापर न केल्यास त्यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्य निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा यांनी नगरमध्ये केल्याने उमेदवार व अधिका-यांमध्ये संताप व्यक्त होत असून, या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नगरमध्ये ९ डिसेंबरला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची अर्ज प्रक्रिया, चिन्हवाटप झाल्यानंतर उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, निवडणुकीमध्ये उमेदवारांनी दैनंदिन होणा-या खर्चाची माहिती ‘ट्रू व्होटर अॅप’द्वारे भरावी, अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
दरम्यान, उमेदवारांनी हा खर्च ‘ट्रू व्होटर अॅप’द्वारे कसा भरावा याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्यांनी हे अॅप विकसित केले आहे ते निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा उपस्थित होते.
प्रत्येक उमेदवाराने याच अॅपद्वारे खर्च
भरावा, अन्यथा उमेदवार व अधिका-यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य भुतडा यांनी केले.
प्रशिक्षण वर्गात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना धमकी देताना अधिकारी व कर्मचारी यांना उद्देशून अत्यंत अश्लील,असभ्य व असंसदीय शब्द प्रयोग केल्यामुळे सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले. सदर प्रशिक्षण वर्गात अनेक महिला अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
भुतडा यांचा ‘ट्रू व्होटर अॅप’चा ठेका तातडीने रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी
लागेल, अशी मागणी कराळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
माफी मागण्याची मागणी
भुतडा यांच्या असंसदीय भाषेच्या वापराबाबत सर्व अधिकारी अवाक झाले असून त्यांचा सर्व स्थरांतून निषेध होत आहे. भुतडा यांनी आपल्या वक्तव्याबाबत तात्काळ जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी अनेक कर्मचारी-अधिकाºयांनी केली. या वक्त्यव्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘लोकमत’ने भुतडा यांच्याशी संपर्क केला, मात्र तो होऊ शकला नाही.