कोपरगावात उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:09+5:302021-01-10T04:15:09+5:30
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचारात उमेदवार आपला हात जोडलेला फोटो, निवडणूक चिन्हाची निशाणी, प्रचारपत्रिका तसेच आपल्या नेत्यांचे फोटो ...
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचारात उमेदवार आपला हात जोडलेला फोटो, निवडणूक चिन्हाची निशाणी, प्रचारपत्रिका तसेच आपल्या नेत्यांचे फोटो वापरून २० ते ३० सेकंदाचे व्हिडीओ तयार करीत आहेत. हे व्हिडीओ तयार करताना त्यात, ''संकल्प बोलके हम तो निकल पडे, हर द्वार खोलके गगन कहे विजयी भवं... , एकजुटीने पेटलं रानं तुफान आलं या, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या.., बाकीचे सारे बाजूला व्हा रे, आला रे आला राजा ... , तू चाल पुढं, तुला गड्या भीती कशाची, पर्वा भी कुणाची.., कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहात नायं.., तो पत्ता करतो गुल, आमचा नेता लई पॉवर फुल्ल.., यासह इतरही गाण्यांचा वापर करीत आहेत. तसेच काही उमेदवार तर चित्रपटातील अभिनेत्याचे अभिनयाचे व्हिडिओ एडिट करून आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करीत आहेत. तर काही उमेदवार हे व्हिडीओच्या माध्यमातून उपदेशात्मक, आव्हानात्मक प्रचार करीत धुमाकूळ घालत आहेत.
एकंदरीतच उमेदवारांना सोशल मीडिया हा जरी प्रचाराचा सोपा मार्ग वाटत असला, तरी यातून मतदाराला मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढ्या मनस्तापानंतर मतदारराजाने उमेदवाराला मतदान केलेच तर भरून पावले असेच म्हणावे लागेल.