उमेदवारांचे साईबाबांना साकडे
By Admin | Published: May 15, 2014 10:55 PM2014-05-15T22:55:45+5:302023-10-30T11:44:14+5:30
शिर्डी : लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक उमेदवारांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावत यशासाठी बाबांना साकडे घातले़
शिर्डी : लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक उमेदवारांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावत यशासाठी बाबांना साकडे घातले़ गुरुवारचा मुहूर्त साधत सकाळी दहाच्या सुमारास भाजपाच्या पूनम महाजन व त्यानंतर काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी सार्इंना यशासाठी आशीर्वाद मागितले, तर दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलही साई समाधीवर नतमस्तक झाले़ याशिवाय गोपीनाथ मुंडे, माजी पंतप्रधान देवेगौडा व जयललिता यांच्या पुत्रानेही या आठवड्यात साईदरबारी हजेरी लावली़ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे मतमोजणीला जाण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घेणार आहेत़ मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांना साकडे घालणारे उमेदवार आपले भवितव्य मतपेटीत बंद होताच सध्या देव-देवतांपुढे नतमस्तक होत आहेत़ याच भावनेतून अनेक उमेदवार साई दरबारी हजेरी लावत असून काहीतरी चमत्कार घडू द्या आणि मीच निवडून येवू द्या या करिता सार्इंना साकडे घालत आहेत़ पूनम महाजन यांनी माध्यमांशी बोलायचे टाळले, तर साईदर्शनानंतर काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी एक्झिट पोल काहीही असले तरी यूपीए सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला़ (वार्ताहर) राष्ट्रवादी अन् एनडीए राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना आम्ही पूर्वी निवडणुकीच्या निकालानंतर यूपीए सरकारमध्ये सहभागी झालो होतो, याची आठवण करून देतानाच देशात स्थिर सरकार स्थापन होवो हीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे सांगितले़ मतदारांनी दिलेला कौल निकालानंतर समोर येणार आहे़ त्यामुळे सर्वांनी सबुरी ठेवून निकालाची थोडी वाट पहावी, असा सल्ला देतानाच एनडीएबरोबर जावे की नको यावर सध्या चर्चा नको, असे पटेल यांनी स्पष्ट केले़