कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:47+5:302021-06-28T04:15:47+5:30
फॅशनच्या नावाखाली सुरू असलेला वाहनचालकांचा हा दणदणाट सर्वांसाठीच त्रासदायक ठरताना दिसत आहे. ध्वनिप्रदूषण करीत सुसाट पळणाऱ्या अशा वाहनचालकांवर कडक ...
फॅशनच्या नावाखाली सुरू असलेला वाहनचालकांचा हा दणदणाट सर्वांसाठीच त्रासदायक ठरताना दिसत आहे. ध्वनिप्रदूषण करीत सुसाट पळणाऱ्या अशा वाहनचालकांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लॉकडाऊन काळात रस्त्यावर वाहने आणण्यास बंदी होती. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी झाले होते. अनलॉक होताच पुन्हा त्रासदायक आवाजांचा गोंगाट सुरू झाल्याचे दिसत आहेत. कंपनी फिटेड हॉर्न काढून तसेच तांत्रिक बदल करून बाईकला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविण्याचे तरुणांमध्ये सर्वाधिक फॅड आहे. असे हॉर्न, सायलेन्सर विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मतही नागरिकांमधून व्यक्त हाेत आहे.
---------------------------------
दोन किलोमीटर अंतरावर येतो आवाज
बुलेटसारख्या बाईकमध्ये तांत्रिक बदल करून कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसविले जातात. शहरातून अशा बाईक आवाज करीत धावतात तेव्हा भूकंप झाल्याचा भास होतो. लहान मुले घाबरून जातात. किमान एक ते दोन किलोमीटर अंतरावर या बाईकच्या फायरिंगचा आवाज ऐकायला येतो.
-----------------------------
फॅन्सी हॉर्नची फॅशन
कार, ट्रक, जीप यासह विविध मोठ्या वाहनांनाही हौशीबहाद्दर म्युझिकल हॉर्न बसवितात. गर्दीच्या ठिकाणी अचानक असे हॉर्न वाजविले तर काळजात धडकी भरते. या गोंगाटाचे ध्वनिप्रदूषण मोजण्याची सध्या कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसत आहे. तसेच या आवाजामुळे कानाचे आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
------------------------------------
कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...
म्युझिकल हॉर्न व विनाकारण हॉर्न वाजविला तर कलम १७७ नुसार ५०० रुपये दंड करण्याची तरतूद आहे. २०२० मध्ये हॉर्नबाबत पोलिसांनी २३ तर २०२१ मध्ये मेपर्यंत अवघ्या सहा कारवाया केल्याची नोंद आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने असा आवाज करणाऱ्यांना मोकळे रान मिळत आहे.
-----------------------------------------
म्युझिकल हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. येणाऱ्या काळात कारवाई वाढविली जाणार आहे. तसेच मोटारसायकलला तांत्रिक बदल करून आवाजाचा सायलेन्सर बसविणाऱ्यांवर कारवाई करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे संबंधित वाहनाचा अहवाल पाठविला जाईल.
-विकास देवरे, वाहतूक निरीक्षक, अहमदनगर शहर