गुगल मॅपच्या आधारे जाणारी कार गेली धरणात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:25 AM2021-01-11T02:25:55+5:302021-01-11T02:26:19+5:30
कार चालकाचा मृत्यू, दोघे बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ (जि. अहमदनगर) : गुगल मॅपच्या अधारे प्रवास करताना रस्त्याचा अंदाज न आल्याने कार सरळ धरणाच्या पाण्यात बुडाली. त्यामधील दोघे वाचले, तर कार चालकाचा बळी गेला. कोतूळ येथील पूल पिंपळगाव खांड धरण पाण्यात असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही.
शनिवारी रात्री पुणे येथील एमटीयू कंपनीचे मालक गुरू सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले (औरंगाबाद) हे कारने कळसूबाईकडे निघाले होते. मात्र, कोतुळात आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ-राजूर-कळसुबाई असा राज्यमार्गाचा रस्ता असताना गुगल मॅपवर कोतूळ ते अकोले असे दाखवल्याप्रमाणे पर्यटक रात्री पावणेदोन वाजता कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले. पावसाने रस्ता ओला असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात समोर पूल पाण्याखाली असल्याचा कोणताही फलक अथवा गुगलवर पूल पाण्याखाली असल्याची सूचना नसल्याने ते सरळ पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात गेले. कार बुडू लागताच तिघेही खिडक्यांतून बाहेर आले. समीर राजूरकर व गुरू शेखर यांना पोहता येत असल्याने ते कडेला आले. चालक सतीश घुले यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.अचानक अपरात्री आरडाओरडा झाल्याने जवळच असलेल्या पेविंग ब्लॉक कंपनीचे कामगार जागे झाले. त्यांनी मालक बाळासाहेब घाटकर, संतोष देशमुख, अरविंद देशमुख यांना कळविले. कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोहणारे घुले यांचा शोध घेत आहेत. संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, अकोलेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे घटनास्थळी दाखल झाले आहेत.