टायर फुटल्याने कार उलटली, तीन जण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:02 PM2021-01-25T13:02:21+5:302021-01-25T13:03:11+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटल्याने कार तीन वेळा उलटली. सुदैवाने एकाच कुटुंबातील तिघे जण बचावले.
घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटल्याने कार तीन वेळा उलटली. सुदैवाने एकाच कुटुंबातील तिघे जण बचावले.
चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. मात्र,कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघातसंगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
राहुल दौलतराव बडवर (रा.वाकद, ता.निफाड, जि. नाशिक, रा.मोशी, आळंदी रोड, पुणे) व त्यांची पत्नी प्रियांका, मुलगा अन्वेश (वय ३ वर्ष) हे दोन दिवसांची सुट्टी संपवून सोमवारी सकाळी कार (क्रमांक एम.एच.-१४, जे.ए.-२९२६) मधून नाशिक-पुणे महामार्गाने मोशी (पुणे) येथे जात होते. ते साडेसात वाजलेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आले असता अचानक कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला.
टायर फुटल्याने चालक बडवर यांचा कारवरील ताबा सुटल्याने कारने तीन पलट्या घेतल्या. कारची चारही चाके वर झाली. या अपघातात हे कुटुंब बचावले असून बडवर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.