नगर जामखेड रस्त्यावर कार उलटली; शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 03:45 PM2022-11-02T15:45:05+5:302022-11-02T15:46:02+5:30
कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले.
अशोक निमोणकर
जामखेड (जि. अहमदनगर) - राजस्थान येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे चारचाकी वाहन नगर जामखेड रोडवरील आष्टी तालुक्यातील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत आसलेले कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी आठ वाजता झाला.
याबाबत माहिती अशी की, जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी म्हणून ओळख असलेले भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (वय 58 वर्षे रा. जामखेड) हे काही दिवसांपुर्वीच आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते. ते मंगळवारी रात्री विमानाने पुणे विमानतळ येथे आल्यानंतर मुलगी व जावई यांना पुणे येथे सोडून चारचाकी वाहनाने (क्र.एम. एच.16 ए. टी 8807) आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेडकडे निघाले होते. त्यांची गाडी बुधवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर -जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. त्यानंतर तेथे असलेल्या पुलावरून अचानक सदर चारचाकी गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने जामखेड येथिल खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले तर त्याच्या गाडीमध्ये आसलेले त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय 52, सुन जागृती भुषण बोरा वय 28, नात (मुलगी) लियाशा भुषण बोरा वय 6 हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा वय 34 हा किरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन सोडण्यात आले आहे. मयत महेंद्र बोरा यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास तपनेश्वर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"