कार चोरणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:22 PM2018-09-21T12:22:50+5:302018-09-21T12:23:12+5:30
बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले.
श्रीरामपूर : बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस वेगाने सूत्रे हलवत आहेत.
राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ सप्टेंबर रोजी जयदीप भगवान पाथरकर यांची तवेरा कार (एमएच १२ एफके ७१२७) चोरीस गेली होती. राहात्यातील चितळी रस्त्यावर अॅक्सिस बँकेसमोरून रात्री अडीच वाजेच्या सुमारास बनावट चावीच्या सहाय्याने ती पळविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी पोलीस पथक औरंगाबादला रवाना करण्यात आले. तेथील कारवाई दरम्यान अब्दुल रहेमान अस्लमबीन शेबे (वय ३०, जहांगिर कॉलनी, हार्सुल, औरंगाबाद), सय्यद रईस सय्यद युनूस (वय ३१, एकतानगर, हार्सुल), आदिनाथ दिलीप जाधव (वय २०, जामगाव कारखाना, ता. गंगापूर), भारत लक्ष्मण दारुंडे (वय २६, अंबेवाडी रोड, गंगापूर) यांना पकडण्यात आले. त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरून नेलेली कार औरंगाबाद येथे आरोपी आदिनाथ जाधव यांच्या घराच्या आडोशाला लावलेली आढळली. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटारसायकली तपासासाठी जप्त केल्या आहेत. पुढील तपासासाठी औरंगाबादला पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.