सावधान..पैसे घेऊन नव-या मुलींचे ‘भागम भाग’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:48 PM2019-06-09T13:48:32+5:302019-06-09T13:51:00+5:30
सध्या राज्यभरात नोकरी नसलेल्या, मोलमजुरी करणा-या, मोठी इस्टेट नसलेल्या मुलांना ‘स्व’ जातीतील मुली मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : सध्या राज्यभरात नोकरी नसलेल्या, मोलमजुरी करणा-या, मोठी इस्टेट नसलेल्या मुलांना ‘स्व’ जातीतील मुली मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दलालाच्या माध्यमातून लग्न मोठ्या थाटात होते. लग्नानंतर पहिल्यांदा नवरी मुलगी माहेरी गेल्यानंतर परत येतच नाही. फसवणूक झाल्यानंतर नवरा मुलगा आणि नातेवाईकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते.
लग्न न जमणा-या मुलांचे झटपट लग्न जमविण्यासाठी दलाल जोमात आहेत. हे दलाल एक लाख ते पाच लाख रूपयांमध्ये ‘सौदा’करतात. इतर समाजातील मुलींशी लग्न लावून देतात. मोठ्या थाटामाटात लग्न केले जाते. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये रितसरपणे नवरी मुलगी माहेरी जाते. त्यानंतर ती कधीच सासरी येत नाही. नवरी मुलींना लग्नानंतर परत आणण्याचा प्रयत्न केल्यास इस्टेटीत वाटा मागण्याची किंवा जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. फसवणूक झाली तरी तक्रार करायला कोणीही पुढे येत नाही. यात काही विशिष्ट समाजातील मुलांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे.
एकट्या अकोले तालुक्यात असे डझनभर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सध्या शेतकरी, मजूर, किंवा आई, वडील नसलेले तसेच कमी प्रॉपर्टी असलेल्या मुलांची लग्न ‘स्व’ जातीतील मुलींच्या अति अपेक्षा वाढल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून परजातीचीही चालेल असा पालकांचा विचार होत आहे. याचाच फायदा काही एजंट घेत आहेत. पेठ, सुरगाणा, जवाहर, मोखाडा, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील काही गावातील व गुजरातच्या सीमावर्ती भागातील विशिष्ट समाजातील मुलगी देतो, असे सांगून हे दलाल फसवणूक करीत आहेत.
मुलीच्या आई, वडिलांची परिस्थिती गरीब आहे. त्यांना पैसे द्यावे लागतील असा बनाव केला जातो. मुलगी पाहण्यासाठी जाताना दलाल दहा ते वीस हजारांचे टोकन घेतात. लग्नाच्या दिवशी ठरलेली रक्कम घेतात. ही रक्कम एक ते पाच लाख, कधी कधी घर किंवा जमीन मुलीच्या नावावर करून घेतात.
यात एखादा अतिचौकस पालक असेल तर रजिस्टर लग्न होते. विशेष म्हणजे लग्न किंवा माळ घालण्याचा कार्यक्रम मुलाच्या गावाकडे गुपचूप मंदिरात होतो. नवरी येते. पहिल्यांदा गेल्यावर मात्र ती परत येत नाही. मला करमत नाही. भाग चांगला नाही. नवरा चांगला नाही, असे सांगितले जाते. समजूत काढायला गेल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. तर कधी कधी घर किंवा जमिनीवर दावा दाखल करण्याची धमकी दिली जाते. नावावर केलेली मालमत्ता परत करण्यासाठी मोठी रक्कम घेतली जाते. यातील काही मुलींचे यापूर्वी लग्नही झालेले असते. अशी अनेकांची फसवणूक झाली, नगर व नाशिक जिल्ह्यात अशा एजंटांची संख्या मोठी आहे.
सध्या शेती व्यवसायातून फारसे उत्पन्न नाही. यामुळे समाजातील अनेक मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती व अल्प उत्पन्न असलेल्या मुलांशी लग्न करणे त्या टाळतात. अशा मुलांची फसवणूक होत आहे. फसवणूक झालेल्या मुलांनी व पालकांनी कायद्याची मदत घेतल्यास इतरांची फसवणूक होणार नसल्याचे शेतकरी अविवाहित मुलांच्या समस्यांचे अभ्यासक शांताराम गर्जे यांनी सांगितले.