चांडगावातील प्रकरण : महिनाभरानंतरही ‘त्या’ लुटीचा तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:11 AM2019-05-09T11:11:54+5:302019-05-09T11:12:12+5:30
चांडगाव शिवारात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून चारचाकी वाहन व इतर ऐवज लुटण्यात आलेल्या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला.
श्रीगोंदा : चांडगाव शिवारात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून चारचाकी वाहन व इतर ऐवज लुटण्यात आलेल्या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र या गुह्याच्या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. यासह इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास ‘जैसे थे’ असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पुणे येथील सोलर पंप बसवणारे ठेकेदार सुनील नारखेडे ७ एप्रिलला चांडगाव शिवारात आपल्या कारमधून चालले होते. दुचाकीहून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत लूट केली होती. श्रीगोंदा पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसानी तपासात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही. महिनाभरात पोलिसांनी केलेल्या तपासावरून या गुह्याच्या तपासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या तांत्रिक बाबीचा आधार घेऊन तपासाला चालना मिळाली असती. काष्टी येथेही असाच गुन्हा घडला होता. त्यात चोरी गेलेले वाहन आणि एका अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेतल्यानंतर या गुह्याचा तपास पूर्णत थंडावला. तशीच अवस्था या गुह्याची झाली आहे.
टाकळी लोणार येथे तमाशा कलावंताना झालेल्या मारहाणीनंतर जवळपास सोळाहून अधिक आरोपींची नावे समोर आली. ही घटना राज्यभर गाजली. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आतापपर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपींसह इतर आरोपी अद्याप मोकाट आहेत. चांडगाव येथील लुटीचा तपास सुरू आहे. लुटणारी टोळी ही बीड जिल्ह्यातील असण्याची प्राथमिक शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.