साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:21 PM2023-07-31T21:21:20+5:302023-07-31T21:23:12+5:30

दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

Case filed against Sambhaji Bhide by Sai Sansthan, action demanded | साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी

साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी

शिर्डी : शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनेचा संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या साईबाबा व महापुरुषांविषयी केलेल्या बेछुट, अवमानकारक व संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद साईनगरीसह जगभरातील साईभक्तांमध्ये उमटले आहेत. साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्वपक्षीय ग्रामस्थांनीही भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन शिर्डी पोलिसांना दिले आहे. दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

या संदर्भात शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी भिडे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, नीलेश कोते, सचिन शिंदे, नितीन उत्तमराव कोते, रवींद्र गोंदकर, दीपक वारूळे, संदीप सोनवणे, विजय जगताप, दत्तात्रय कोते, देवराम सजन, सर्जेराव कोते, नितीन अशोक कोते, विकास गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन वाणी, अमोल कोते, विशाल कोते, अविनाश गोंदकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांची भेट घेऊन संस्थानने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. यानंतर जाधव यांनी वरिष्ठांशी व व्यवस्थापनाशी चर्चा करून भिडे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संस्थानचे संरक्षण प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिडेंचा फोटो व्हायरल
सांगलीतील साईमंदिरात काही वर्षांपूर्वी भिडे साईबाबांची आरती करतानाचा फोटोही समाज माध्यमांत फिरत आहे. एकीकडे भिडे साईबाबांची आरती करतात व दुसरीकडे साईबाबांच्या मूर्ती घराबाहेर काढण्याचे आवाहन करतात. या दुटप्पीपणाकडे शिर्डीकरांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Case filed against Sambhaji Bhide by Sai Sansthan, action demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.