भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:12 PM2020-08-29T13:12:43+5:302020-08-29T13:13:27+5:30
दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर गुन्हा दाखल केला आहे.
पाथर्डी : दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर गुन्हा दाखल केला आहे.
मोनिका राजळे यांनी १ आॅगस्ट रोजी दूध दरवाढ व इतर विविध मागण्यांसाठी सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला होता. परंतु याबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले नव्हते. परंतु ४ आॅगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगाव निवासस्थानासमोर प्रशासनावर आमदारांचा अंकुश राहिलेला नाही. यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रकरणी मात्र पोलिसाकडून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलीस दुटप्पी धोरण राबवत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून शेवगाव पोलीस विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी (२८ आॅगस्ट) रात्री उशिरा या आंदोलकांविरुध्द गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी आमदार मोनिका राजळे, माणिक कोंडिबा खेडकर, विष्णू अकोलकर, गोकुळ दौंड, जनार्धन वांढेकर, प्रवीण राजगुरु यांच्यासह ३५ कार्यकर्त्याविरुद्ध पो.कॉ. दीपक शेंडे यांच्या फिर्यार्दीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.