वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:21 AM2024-10-27T11:21:31+5:302024-10-27T11:27:06+5:30
संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jayashree Thorat : संगमनेरच्या धांदरफळ बुद्रुक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जात टीका केली. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी जयश्री थोरात, सुधीर तांबे, दुर्गा तांबे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र आता जयश्री थोरात यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धांदरफळ बुद्रुक येथे जयश्री थोरात यांच्यावर भाजपाचे नेते सुजय विखे -पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्या टीकेनंतर महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. वसंतराव देशमुख आणि सुजय विखे यांना या प्रकरणात अटक करण्याची मागणी करत थोरात समर्थकांनी संगमनेर पोलीस ठाण्याचा बाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र आता या आंदोलनामुळे जयश्री थोरात यांच्यासह दुर्गा तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री थोरात यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते आणि थोरात समर्थकांनी शनिवारी संगमनेर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि माजी आमदार सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री वसंत देशमुख यांनी जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेनंतर थोरात समर्थकांनी विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड करून वाहन पेटवले होते. विखे समर्थकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थोरात समर्थकांनी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या दिला होता.