पक्षनिधीत गैरव्यवहाराचा करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल; २२ लाख रोख, सोनेही घेतल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 09:31 AM2022-09-05T09:31:35+5:302022-09-05T09:32:42+5:30
करुणा मुंडे यांनी २२ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीचे सोने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संगमनेर (जि. अहमदनगर) : पक्ष उभारणीसाठी घेतलेले रुपये आणि सोने परत न केल्याने, करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करुणा मुंडे यांनी २२ लाख ४५ हजार रुपये आणि १२ लाख रुपये किमतीचे सोने परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा (रा. ११०१, ६४, ग्रीन सांताक्रुझ वेस्ट, मुंबई) यांच्या विरुद्ध भारत संभाजी भोसले (४०, रा. कोंची, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची मागणी केल्यावर ‘मैं अजय देडे को भेज तुमको खत्म करूंगी’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनीही दिली होती फिर्याद
माझी ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली, अशी फिर्याद ऑगस्ट महिन्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात करुणा मुंडे यांनी दिली होती. त्यावरून भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.