जात पंचायतीमध्ये दोन गटांत धुमश्चक्री, २५ जण जखमी, आठ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:06 PM2018-07-11T23:06:15+5:302018-07-11T23:06:34+5:30
श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जोशी वस्तीवर तिरुमली नंदी समाजातील जात पंचायत सदस्यांच्या बैठकीत जातीतून बहिष्कृत केलेल्या लोकांनी मोबाइलद्वारे शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली.
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जोशी वस्तीवर तिरुमली नंदी समाजातील जात पंचायत सदस्यांच्या बैठकीत जातीतून बहिष्कृत केलेल्या लोकांनी मोबाइलद्वारे शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये तलवार, गज, कु-हाडीचा सर्रास वापर झाला. या घटनेत सुमारे २५ जण जखमी झाले. यामध्ये आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी दोन तरुणींना विवस्त्र करून मारहाण करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
या मारामारीत व्यंकट बाबू काकडे, उत्तम बाबूराव काकडे, रामदास गंगाराम मले, गंगाराम हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगाराम पालवे, कान्हू बाबू गायकवाड, बाबाजी कान्हू गायकवाड, रमा गायकवाड, सोनाली रमा गायकवाड, शालन गोविंद पालवे, रावसाहेब पालवे, सुरेश भीमा पालवे, सुभाष काकडे, बायडाबाई फूलमाळी, साहेबराव काकडे, अशोक पालवे, अलका मले हे जखमी झाले आहेत. तीन पिढ्यांपासून नंदीवाले समाजात जातीतून बहिष्कृत केलेले लोक व जात पंचायत सदस्यांमधील वाद धुमसत आहे.
या गटात गेल्या वर्षी मारामारी झाली होती. त्यावेळी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी जात पंचायत सदस्यांनी बैठक बोलावली होती. ज्या कुटुंबांना जातीमधून बाहेर काढले त्यातील काही महिला त्यांच्या घरांमधून ही जात पंचायत पाहात होत्या. तर एक जण जातपंचायत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या जातपंचायतीची शूटिंग करत होता. याचा राग आल्यामुळे ‘तू शूटिंग का करतोस’ या कारणावरून जातपंचायतीमधील लोकांनी या मुलाला मारहाण केली. मारहाण करणारे बीड, पुणे जिल्ह्यातील ओझर, धामणगाव तसेच काही स्थानिक होते. या दोनशे ते अडीचशे लोकांनी कारखान्यावरील तिरुमली नंदी समाजातील वस्तीवर हल्लाबोल करत तलवार, लोखंडी गज, दगडाने मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.