कापूरवाडीत खडीक्रशरच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ
By Admin | Published: April 7, 2017 05:55 PM2017-04-07T17:55:41+5:302017-04-07T17:55:41+5:30
खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ ७- नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे असणाऱ्या खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़ त्यामुळे कापूरवाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे जवळपास २० खडी क्रशर आहेत. यातील काही गावातील लोकांचे तर काही बाहेरच्या लोकांच्या मालकीची आहेत. खडी क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे गावकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यातून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने काही महिन्यांपूर्वीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन खडी क्रशर बंद करण्याची मागणी केली होती. क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याची गंभीर बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी गावातील काही महिला व गावकरी एकत्र जमले. त्यांनी थेट खडी क्रशर केंद्रावर जाऊन खडी क्रशर बंद केले. तसेच तेथील यंत्र सामुग्रीची जाळपोळ करत आपला संताप व्यक्त केला. खडी क्रशर चालकांनी धुळीचा बंदोबस्त करायला हवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील काही शेतकऱ्यांची जमीन या क्रशरच्या धुळीमुळे नापीक होत आहे़
जिल्हाधिकारी करणार पाहणी
कापूरवाडी येथील खडी क्रशरच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याची गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिल्याने शुक्रवारी जाळपोळ व तोडफोडीचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे हे शनिवारी कापूरवाडीत भेट देऊन क्रशरची पाहणी करून गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
खडी क्रशर जवळच शाळा
कापूरवाडी येथील खडी क्रशच्या जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे. या क्रशरमधून बाहेर पडणारी धूळ व त्यातील आवाज यांचा त्रास या शाळकरी मुलांना होत आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांना येथे शिक्षणही घेता येत नाही़ त्यामुळे पालकांमध्ये संताप होता़