बिबट्या देतोय पिंज-याला हुलकावणी; शेतक-यांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:16 PM2020-03-01T16:16:29+5:302020-03-01T16:17:09+5:30
कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.
कोल्हार : कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.
मानवाने जंगली प्राण्यांच्या हक्काच्या निवा-यावर अतिक्रमण केले. त्यामुळे जंगलातील ही श्वापदे मानवी वस्तीकडे वळली. प्रवरा पट्ट्यात नगर जिल्ह्यात बहुसंख्येने साखर कारखानदारी आहे. बिबट्यांना येथे मुबलक पाणी, लपण्यासाठी उसाचा आडोसा व शेतक-यांचे पशुधन मिळत आहे. सर्व सुविधा मिळत असल्याने बिबटे उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत. येथेच प्रजनन होत असल्याने बिबट्यांची संख्या आता वाढतच आहे.
बिबटे पिंज-यात जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडे केवळ एकच उपाय आहे. पिंजºयात भक्ष्य ठेवून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा करणे. मात्र आता परिसरातील चतुर बिबटे वनखात्याने पिंज-यात ठेवलेल्या भक्ष्यास बळी पडत नसल्याने बिबटे जेरबंद होण्याचे प्रमाण घटले आहे.
भगवतीपूर येथील थडी फाटा परिसरात बिरोबा मंदिराजवळ लावलेल्या पिंजºयात अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्यास असलेल्या तीन बिबट्यापैकी एकही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे आता वनखात्याने येथील पिंजराच अन्यत्र हलविला आहे. येथे रोजच पशुधन व कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.
एकाच वेळी तीन बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाल्याने त्याच्या दहशतीने सायंकाळी सात नंतर शेतकरी बाहेर पडत नाहीत. त्यात रात्री ११ नंतर वीज येते. दिवसभर वीज नसल्याने शेतीमध्ये पिकांना पाणी देता येत नाही, असे भगवतीपूरचे माजी उपसरपंच बी. के. खर्डे यांनी सांगितले.