कोपरगावात बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:47+5:302021-03-31T04:20:47+5:30
कोपरगाव : शहरातील संजयनगरमध्ये बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहे. गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. रात्री, ...
कोपरगाव : शहरातील संजयनगरमध्ये बेकायदेशीरपणे गोवंश हत्त्या होत आहे. गोवंश हत्त्या करून शहरवासीयांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. रात्री, अपरात्री गोवंश कत्तल करून नगरपरिषदेच्या व शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. या बेकायदा कत्तलीतून निघणारे रक्त-मांस नाल्यातून नदीत सोडल्याने सर्वांचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
वहाडणे म्हणाले, कसाईवर्गाला विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून दिली. अनेकांनी त्याचे भाडेही थकवलेले आहे. संबंधितांना अनेकदा सांगूनही मनाई येथील अधिकृत कत्तलखान्याचा वापर होत नाही, दुकानांचे भाडेही थकविलेले आहे. आरोग्य विभाग व मार्केट विभागाने दिलेल्या नोटिसा - सूचना पाळाव्यात अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. नागरिक, नगरपरिषद व शासनाचा अंत पाहू नका. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. याआधी तुम्हाला सहकार्य करूनही तुम्ही असेच बेकायदा कृत्य करणार असाल तर ते कुणालाही परवडणारे नाही. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोंबा मारून गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांमध्ये हिंमत असेल. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची, स्वच्छतेची काळजी असेल तर त्यांनी या विषयावरही तोंड उघडावे, असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.
.................
यासंदर्भात आम्हाला माहिती नाही. मात्र, आमच्या निदर्शनास आल्यानंतर असे काम करणाऱ्यावर आम्ही तत्काळ कारवाई करतो. त्यानुसार मंगळवारी (दि. ३०) सकाळी कारवाई करीत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
- वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, कोपरगाव.