कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे!
By शेखर पानसरे | Published: June 28, 2023 02:13 PM2023-06-28T14:13:26+5:302023-06-28T14:15:31+5:30
पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते.
संगमनेर : कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी गोवंशीय जनावरे बांधली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. निदर्यतेने बांधलेल्या ३२ गोवंशीय जनावरांना जीवदान मिळाले असून मंगळवारी (दि.२७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी बुधवारी (दि.२८) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील खांजापूर शिवारात कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या संख्येने गोवंशीय जनावरे बांधली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मिळाली. पाऊस झाल्याने जनावरे बांधलेल्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. अडगळीत जनावरे बांधलेल्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते पोहोचले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले.
पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते. पिकअप वाहनांमधून गोवंशीय जनावरांना गोशाळेत नेण्यात आले. तसेच पोलिसांनी दोन दुचाकी वाहने देखील जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस हेड कॉस्टेबल रामकिसन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉस्टेबल पारधी अधिक तपास करीत आहेत.