सावधान; फेसबुक मेसेंजरद्वारे गंडविण्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:20 AM2021-05-14T04:20:00+5:302021-05-14T04:20:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : स्मार्टफोन हाती आल्याने समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या माध्यमांचा वापर ...

Caution; Disruptive fund through Facebook Messenger | सावधान; फेसबुक मेसेंजरद्वारे गंडविण्याचा फंडा

सावधान; फेसबुक मेसेंजरद्वारे गंडविण्याचा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : स्मार्टफोन हाती आल्याने समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या माध्यमांचा वापर चुकीचा पद्धतीने होत असल्याने फसवणुकीच्या घटना घडल्याचे दररोज समोर येत आहे. सायबर भामट्यांकडून फेसबुक खाते क्लोन करत मेसेंजरद्वारे अनेकांना गंडविण्यात येते आहे. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनी सावधान राहावे, असे आवाहन पोलीस व सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

तरुण वर्गाबरोबर ज्येष्ठ नागरिकांकडूनही समाजमाध्यमांचा वापर होताना दिसतो आहे. आता तर अगदी शालेय विद्यार्थ्यांकडेदेखील स्मार्टफोन पाहायला मिळतो. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद आहेत. परंतु ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात असल्याने स्मार्टफोनचा वापर अधिकच वाढला आहे. ही बाब आता जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. फेसबुक हे लोकप्रिय माध्यम आहे. यावर अनेक जण स्वत:ची माहिती, फोटो टाकत असतात. परंतु या माहिती व फोटोचा वापर करत सायबर भामटे अनेकांची फसवणूक करत आहेत. फेसबुकचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांबरोबरच उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, मंत्र्यांचे स्वीय सहायक यांचेही फेसबुक खाते क्लोन करून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात आली होती.

--------------

ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवून मोकळे

फेसबुकवर आधीपासून असलेल्या खात्यातील माहिती आणि फोटोचा वापर करत सायबर भामटे खाते क्लोन म्हणजेच बनावट तयार करतात. त्यानंतर मेसेंजरद्वारे संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांकडे पैशांची मागणी करण्यात येते. आपला मित्र किंवा नातेवाईक अडचणीत असेल, असे समजून खात्री न करता अनेक जण ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवून मोकळे होतात. त्यानंतर त्यांना समजते की, आपली फसवणूक झाली आहे. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत.

------------

सायबर भामटे हे शक्यतो परराज्यांतील असतात. ते फेसबुकवर कोणतेही एक शहर निवडून तेथील लोकांना टार्गेट करतात. ज्याचे फेसबुक खाते क्लोन केले जाते ते कुणाचे आहे, याचे त्यांना काही घेणे-देणे नसते. फक्त पैसे कसे मिळतील हाच त्यांचा मूळ उद्देश असतो. ज्यांचे फेसबुक प्रोफाइल ओपन असतात आणि फ्रेंड लिस्ट ओपन असते, असे लोक टार्गेट केले जातात. पोलीस तक्रार करून आणि बाकी सायबर तपास करून सायबर भामट्यांची खरी नावे, पत्ते मिळतात. प्रत्येकाने काळजी घेऊन आपले फेसबुक प्रोफाइल लॉक करावे.

- ओंकार गंधे, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, नाशिक

-------------

समाजमाध्यमांद्वारे कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. ही तक्रार आपण पुढील तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करतो. त्यामुळे ज्यांची कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे.

- राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Web Title: Caution; Disruptive fund through Facebook Messenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.