सावधान...साेशल मीडियाच्या माध्यमातून होतेय ‘सेक्सटॉर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:59 AM2021-02-20T04:59:15+5:302021-02-20T04:59:15+5:30

अहमदनगर: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गे होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचे बहुतांश प्रकार प्रचलित आहेत. आता मात्र सायबर टोळ्यांनी ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून पैसे ...

Caution ... 'Sextortion' takes place through social media | सावधान...साेशल मीडियाच्या माध्यमातून होतेय ‘सेक्सटॉर्शन’

सावधान...साेशल मीडियाच्या माध्यमातून होतेय ‘सेक्सटॉर्शन’

अहमदनगर: सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गे होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीचे बहुतांश प्रकार प्रचलित आहेत. आता मात्र सायबर टोळ्यांनी ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीनच प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसांत नगर जिल्ह्यात अनेक जण या ‘सेक्सटॉर्शन’चे बळी ठरले आहेत. गेल्या दोन महिन्यांत येथील सायबर पोलीस ठाण्यात ३० जणांनी संपर्क करून त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तर २० जणांनी तक्रार दिली आहे.

फेसबुकसह मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप, पॉर्न साईट आदी ठिकाणी सायबर गुन्हेगार बनावट खाती बनवून पीडित व्यक्तींच्या संपर्कात येतात. खातेधारक व्यक्ती ही हायप्रोफाईल व सुंदर तरुणी असल्याचे भासविले जाते. प्रथम पीडित व्यक्तीसोबत चॅटिंग करून मैत्री केली जाते. नंतर प्रेमाच्या गप्पा करून अश्लील बोलण्यात गुंतविले जाते. बहुतांशवेळा समोरील व्यक्ती पीडित व्यक्तीला फेसबुक व व्हॉटसॲपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून एकांतात जाण्यास सांगते. यावेळी त्याला नग्न होण्यास सांगून अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले जाते. याचवेळी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडीओ चित्रित केला जातो. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याचा व्हिडीओ व छायाचित्र साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. ५ हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जाते. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना ऑनलाईन पैसे पाठवितात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रारी करतात.

---------------------------

‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे काय ?

एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाईन संपर्कात येऊन त्याचा मोबाईल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमध्ये घुसघाेरी करणे, त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडने, व्हिडीओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे.

-----------------------------------

या लोकांना केले जाते लक्ष्य

सायबर गुन्हेगार पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्याआधी फेसबुकवर आधी त्याची प्रोफाईल पाहतात. सदर व्यक्ती डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील अथवा उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल तर त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले असून काहींनी भीतीपोटी पैसेही दिले आहेत.

-------------------------------------

अशी घ्यावी काळजी...

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

व्हिडीओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसेच कृत्य करू नये.

आपल्या फोनमध्ये खासगी, अर्धनग्न, नग्न फोटो, व्हिडीओ सेव करून ठेवू नये.

‘सेक्सटॉर्शन’ संदर्भात काही घटना घडली तर कुणालाही पैसे देऊ नयेत. यासंदर्भात तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी केले आहे.

फोटो १९ फसवणूक

Web Title: Caution ... 'Sextortion' takes place through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.