न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात :राज्य माहिती आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:22 PM2019-01-23T14:22:27+5:302019-01-23T14:23:31+5:30
न्यायालयातील प्रशासकीय कामकाजासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात अपिलार्थीला देण्याचे आदेश राज्याचे माहिती आयुक्त के़ एल़ बिश्नोई यांनी जिल्हा न्यायालयातील जनमाहिती अधिकारी यांना दिले आहेत़
अहमदनगर : न्यायालयातील प्रशासकीय कामकाजासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात अपिलार्थीला देण्याचे आदेश राज्याचे माहिती आयुक्त के़ एल़ बिश्नोई यांनी जिल्हा न्यायालयातील जनमाहिती अधिकारी यांना दिले आहेत़ या निकालामुळे यापुढे कुठल्याही न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्याअन्वये संबंधित न्यायालयाला नाकारता येणार नाही़
शिर्डी येथील दिगंबर हरिभाऊ कोते यांनी केलेल्या अपिलात माहिती आयुक्तांनी हा निकाल दिला आहे़ कोते यांनी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी येथील जिल्हा न्यायालयातील जनमाहिती अधिकारी यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता़
या अर्जात कोते यांनी राहाता न्यायालयातील १९ नोव्हेंबर २०१६ रोजीचे दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतचे न्यायाधीश क्रमांक १ यांच्या दालनाच्या दरवाजा समोरील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागितले होते़ या अर्जावर तत्कालीन जन माहिती अधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालय यांची अधिसूचना २००९ चे नियम १२ (ए) व माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ८ (ब) चा संदर्भ देत माहिती देण्यास नकार दिला होता़
या निर्णयाविरोधात कोते यांनी अपिलिय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली़ अपिलिय अधिकारी यांनीही कोते यांचा अर्ज निकाली काढून माहिती देण्यास नकार दिला़ त्यानंतर कोते यांनी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात अपिल केले होते़ या अर्जावर राज्याचे माहिती आयुक्त के़ एल़ बिश्नोई यांच्यासमोर सुनावणी झाली़ याबाबत आयुक्तांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, तत्कालीन जनमाहिती अधिकारी यांनी अपिलार्थीस चुकीच्या कारणाने माहिती पुरविली आहे़ अपिलार्थी यांनी मागितलेली माहिती वैयक्तिक नसून शासकीय कामकाजाची आहे़ हे माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम २ (च) व २ (ज) नुसार माहिती व माहिती अधिकाराच्या व्याख्येत मोडते़ त्यामुळे सदर जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थीस माहिती पुरविणे आवश्यक होते़
आता विद्यमान जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थी यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेले सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज स्टोरेजमध्ये उपलब्ध असल्यास ते हा निर्णय झाल्यापासून १५ दिवसांच्या उपलब्ध करून द्यावे़
फुटेज उपलब्ध नसल्यास अपिलार्थीस वस्तुस्थितीदर्शक उत्तर द्यावे,असे आदेश माहिती आयुक्तांनी दिले आहेत़
या आदेशामुळे यापुढे कुठल्याही न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्याअन्वये संबंधित न्यायालयाला नाकारता येणार नाही़