अकोले तालुक्यात परीक्षा केंद्रांना सीसीटीव्हीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 06:51 PM2018-02-15T18:51:36+5:302018-02-15T18:52:11+5:30

दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना अकोले तालुक्यातील बहुसंख्य परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही बसविण्याच्या परीक्षा मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित मंडळाचे कॉपीमुक्त परीक्षेचे धोरण धाब्यावर बसविले आहे.

CCTV scams to the examination centers in Akole taluka | अकोले तालुक्यात परीक्षा केंद्रांना सीसीटीव्हीचे वावडे

अकोले तालुक्यात परीक्षा केंद्रांना सीसीटीव्हीचे वावडे

कोतूळ : दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना अकोले तालुक्यातील बहुसंख्य परीक्षा केंद्रांनी सीसीटीव्ही बसविण्याच्या परीक्षा मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित मंडळाचे कॉपीमुक्त परीक्षेचे धोरण धाब्यावर बसविले आहे.
गेल्यावर्षी जिल्हाभर ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रावर पालक, परीक्षार्थींचे पंटर , गाव पुढारी तर काही कामचुकार शिक्षक कॉपी पुरविताना आढळले होते. अनेक झेरॉक्स व कॉपीसाठी पूरक ‘नॅनो ’ पुस्तके परीक्षा केंद्र नियंत्रणरेषेच्या आत सापडली. काही ठिकाणी मास कॉपीचे प्रकारही घडले. माध्यमांनी त्यावर प्रकाश झोत टाकून शिक्षण विभागाच्या हा प्रकार लक्षात आणून दिला.
२०१६ पासून कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा मंडळाने केंद्र संचालक वेगळता सर्व कर्मचा-यांना मोबाईल बंदी घातली आहे. तसेच त्याच वर्षी सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. तालुक्यात बारावीच्या चार केंद्रांपैकी फक्त अगस्ती महाविद्यालयाच्या केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित चार पैकी तीन बारावीची व चौदा दहावीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत. अनेक शाळा आमदार, खासदार निधी, लोकवर्गणी, दानशूर लोकांकडून अलिशान इमारती, कंपाऊंड वॉल , रंगरंगोटी, डिजिटल शाळेसाठी संगणक घेतात. मात्र त्यामानाने जुजबी किंमतीचे सीसीटीव्ही अनिवार्य असताना घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अकोले तालुक्यात बारावीच्या चार केंद्रावर वर्षी ३८०५ विद्यार्थी तर दहावीच्या चौदा केंद्रावर ५३४१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अगस्ती महाविद्यालयातील बारावीच्या केंद्रात सीसीटीव्ही आहे. हा अपवाद सोडल्यास राजूरचे सर्वोदय विद्यालय, कोतुळचे कोतुळेश्वर विद्यालय, केळी रूम्हणवाडी येथील सरकारी आश्रमशाळेत सीसीटीव्ही नाही. तालुक्यात दहावीची १४ परीक्षा केंद्र आहेत. त्यात अकोलेतील मॉडर्न विद्यालय, अगस्ती विद्यालय, राजूरचे सर्वोदय विद्यालय, कोतुळचे कोतुळेश्वर विद्यालय, देवठाणचे आढळा विद्यालय, समशेरपूरचे अगस्ती विद्यालय, ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालय, इंदोरीचे प्रवरा विद्यालय, केळी रूम्हणवाडीचे शासकीय आश्रम, शेंडीचे माध्यमिक विद्यालय, लिंगदेव येथील न्यू हायस्कूल, साकीरवाडीचे राजर्षी शाहू विद्यालय, गणोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, अंभोळचे आम्लेश्वर विद्यालय या केंद्रांचा समावेश आहे. पण यातील एकाही केंद्रात सीसीटीव्ही नाही.

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने मोबाईल बंदी व सीसीटीव्ही अनिवार्य केली आहे. सर्वांना पत्रव्यवहार केला आहे. कडक सूचनाही दिल्या आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सीसीटीव्ही बसवावेत. यावर्षी परीक्षा काळात कॉपीमुक्तपरीक्षेसाठीतहसीलदार व शिक्षण विभागाची दोन पथके विशेष लक्ष ठेवणार आहेत.
-अरविंद कुमावत, शिक्षण विस्ताराधिकारी, अकोले.

Web Title: CCTV scams to the examination centers in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.