सुप्यातील स्मशानभूमी झाली चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:20+5:302020-12-26T04:17:20+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्मशानभूमी चकाचक झाली असून स्वच्छता केल्याने दुर्गंधी गायब झाली आहे. सुप्यातील ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्मशानभूमी चकाचक झाली असून स्वच्छता केल्याने दुर्गंधी गायब झाली आहे. सुप्यातील स्मशानभूमीची दुरावस्था, वाढलेले गवत, अस्वच्छ परिसर याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
ग्रामपंचायतीचे प्रशासक सचिन चौधरी व ग्रामविकास अधिकारी अशोक नागवडे यांनी याबाबत कार्यवाही केली. स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले असून त्यात वाढलेल्या काटेरी गवताने नागरिकांना तेथे बसने शक्य होत नव्हते. हे सगळे काटेरी गवत काढून टाकण्यात आले. बाजूला असणाऱ्या पायऱ्या झाडून स्वच्छ करण्यात आल्याने आता त्या पायऱ्यांवर नागरिकांची बसण्याची सोय झाली आहे. स्मशानभूमीवर बाजूने पत्र्याचे शेड असून त्यात सप्तपर्णीची झाडे अस्ताव्यस्त वाढल्याने अडचण झाली होती. आता या झाडांची व्यवस्थित कटिंग केल्याने हा परिसर मोकळा झाला आहे.
अजून तेथे गेटही बसवले जाणार असून त्यामुळे येथील मद्यपींचा व मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त होणार आहे. या कामाबाबत संजय साबळे, रामकृष्ण मेहत्रे, माजी सरपंच राजू शेख, उपसरपंच ज्योती पवार, माजी सरपंच विजय पवार, माजी उपसभापती दीपक पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार, योगेश रोकडे, किरण पवार, सचिन काळे, सागर मैड, प्रताप शिंदे व ग्रामस्तांनी लोकमतला धन्यवाद दिले आहेत.
-------------
स्मशानभूमीच्या स्वच्छता व देखभालीची व्यवस्था पाहण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्ती करण्याबाबत नव्याने निवड होणारे ग्रामपंचायत पदाधिकारी निर्णय व अंमलबजावणी करतील.
- अशोक नागवडे, ग्रामविकास अधिकारी
-------------
फोटो ओळी - २५सुपा स्मशानभूमी
सुपा येथील स्मशानभूमीची स्वच्छता केल्याने तेथील परिसर आता चकाचक झाला आहे.