स्मशानभूमीत दोघे भाऊ बनले कोरोनाबळींचे नातलग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:49+5:302021-04-28T04:21:49+5:30
लोणी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटीने सर्वत्र थैमान घातले असून, अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या पार्थिवावर ...
लोणी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटीने सर्वत्र थैमान घातले असून, अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकही पुढे येत नाहीत. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कुटुंबांनाच त्यांचे नातेवाईक होऊन अग्निडाग द्यावा लागत आहे.
जगभरातील लोक कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस त्यांची जबाबदारी निभावत आहेतच, पण सामान्य माणसंही या लढाईत मागे नाहीत. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व लोणी बुद्रुक येथील स्मशानभूमीत रुग्णांचे अंत्यसंस्कार करणारा शाम कडमांचे (वय२५) व त्यांचा १८ वर्षांचा भाऊ राहुल कडमांचे सध्या अनेक कुटुंबांचा आधार बनले आहेत.
कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तरी हे कडमांचे बंधू त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. हे काम त्यांचे कुटुंब पिढ्यान् पिढ्या करीत आले आहे. मात्र, कोरोना काळातही कोणीही मृतदेहाजवळ जात नाही ते काम शाम व त्यांचा भाऊ करीत असल्याने, त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतक होत आहे.
............
भावाच्या मदतीला भाऊ आला धावून...
आतापर्यंत श्यामचे वडील लक्ष्मण हेच लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यविधी करत, त्यांच्यानंतर अल्पवयातच शामने हे काम हाती घेतले. मात्र, कोरोनाबाधित असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता श्यामच्या मदतीला त्याचा एकोणवीस वर्षांचा भाऊ राहुल हा धावून आला असून, तो भावाच्या कामाचा भाग काहीसा हलका करण्याचा प्रयत्न करीत आहे.
...........
खूपदा वाईट अवस्थेतले मृतदेह पाहिले, पण ही परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. जवळचे नातेवाईक रडतात. आमच्या माणसाला शेवटचे पाहू द्या, म्हणून विनंती करतात आणि कोणीच काही करू शकत नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लांब ठेवणे गरजेचे असते. आम्ही त्यांना आश्वासन देतो की, अंतिम संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होतील. सगळे विधी पार पाडले जातील. कशातही कसूर राहणार नाही. इतके तर आम्ही त्यांच्यासाठी करूच शकतो.
- श्याम कडमांचे, लोणी
- लोणी१,२,