महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:42+5:302021-05-21T04:21:42+5:30

महात्मा गांधींच्या संगमनेर दौऱ्याबाबत सांगताना डॉ. खेडलेकर यांनी सांगितले, २१ मे १९२१ रोजी महात्मा गांधी नाशिकहून संगमनेरला आले. संगमनेरातील ...

Centenary of Mahatma Gandhi's visit to Sangamner | महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीची शताब्दी

महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीची शताब्दी

महात्मा गांधींच्या संगमनेर दौऱ्याबाबत सांगताना डॉ. खेडलेकर यांनी सांगितले, २१ मे १९२१ रोजी महात्मा गांधी नाशिकहून संगमनेरला आले. संगमनेरातील काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबूराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले. त्यादिवशी ते शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई हे देखील होते.

महात्माजींच्या मुक्कामानंतर या परिसराला गांधी चौक म्हणून ओळखले जात आहे. दुसऱ्या दिवशी २२ मे रोजी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात गांधीजींची जाहीर सभा झाली. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संगमनेरकरांनी टिळक स्वराज्य फंडासाठी देणग्या दिल्या. सभेत गांधीजींनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन द्वारकाबाई मोहनीराज देशपांडे या गृहिणीने भर सभेत आपल्या हातातली सोन्याची पाटली टिळक स्वराज्य फंडासाठी दिली. संगमनेरकर नागरिकांच्या वतीने गांधीजींना या सभेत मानपत्र देण्यात आले. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या या मानपत्रावर लालसाहेब पिरजादे, गणेश सखाराम सराफ, बाबूराव अण्णाजी ठाकूर, शिवनारायण शाळीग्राम नावंदर व तुकाराम बाळाजी निऱ्हाळी यांची नावे कोरलेली आहेत. हे मानपत्र गांधीजींनी त्यांची आठवण म्हणून पुन्हा नगरपालिकेकडे सुपुर्द केले. महादेव शंकर शिंदे नावाच्या कारागिराने तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले हे मानपत्र सध्या नगरपालिकेकडे उपलब्ध आहे. या सभेनंतर महात्मा गांधी कोपरगाव मार्गे येवला येथे सभेसाठी रवाना झाले. संगमनेरच्या सभेचा वृत्तांत ९ जून १९२१ च्या ‘नवजीवन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.

Web Title: Centenary of Mahatma Gandhi's visit to Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.