केंद्राने सिमेंट, स्टीलच्या भाववाढीचे नियंत्रण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:39+5:302021-02-13T04:20:39+5:30
सिमेंट व स्टीलच्या भाववाढी नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी या तिन्ही संघटनांच्यावतीने शुक्रवारी देशव्यापी संप पुकारुन धरणे आंदोलन करण्यात आले. नगरमध्ये ...
सिमेंट व स्टीलच्या भाववाढी नियंत्रणात आणण्याच्या मागणीसाठी या तिन्ही संघटनांच्यावतीने शुक्रवारी देशव्यापी संप पुकारुन धरणे आंदोलन करण्यात आले. नगरमध्ये औरंगाबाद रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसमोर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी आंदोलन केले. यावेळी क्रेडाईचे संस्थापक अध्यक्ष जवाहर मुथा, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पागिरे, इंजिनिअर आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलिम शेख, सचिव अन्वर शेख, खजिनदार प्रदीप तांदळे, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, मिलिंद वायकर, शरद मेहेर, विजय तवले, यश शाह आदी उपस्थित होते.
जवाहर मुथा म्हणाले, कोरोना व लॉकडाऊनमुळे मरगळ आलेला बांधकाम व्यवसाय स्टील व सिमेंटच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे आणखी अडचणीत आला आहे. सिमेंटची जवळपास २५ टक्के तर स्टील जवळपास ५० टक्के महाग झाले आहे. कंपन्यांच्या मोनोपॉली वृत्ती थांबली पाहिजे. परदेशामध्ये निर्यातीच्या नावाखाली तुटवडा दाखवून मनमानी पद्धतीने कंपन्या भाववाढ करत आहेत. या भाववाढीचा निषेध तिनही संघटनांच्यावतीने करत देशव्यापी आंदोलन छेडले आहे. त्वरित भाववाढ कमी झाली नाही तर संपूर्ण देशातील बांधकाम थांबविण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.
मच्छिंद्र पागिरे म्हणाले, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी सिमेंट व स्टीलच्या कंपन्यांना भाववाढ थांबविण्याची तंबी दिली आहे. कंपन्यांचा मनमानी कारभार थांबण्यास तयार नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सलिम शेख म्हणाले, सिमेंट व स्टील भाववाढ तातडीने नियंत्रणात येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शेतीनंतर जास्तीत जास्त रोजगार देणारे देशातील हा एकमेव उद्योग आहे. लाखो कुटुंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत. यावेळी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
............................
फोटो १२ आंदोलन
ओळी- बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, आर्किटेक्ट इंजिनिअर्स ॲण्ड सर्वेअर्स असोसिएशन व क्रेडाई संघटनेच्यावतीने सिमेंट व स्टीलच्या भाववाढीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.