सोमैया महाविद्यालयास केंद्र शासनाचा पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:56+5:302021-04-28T04:21:56+5:30
कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा ...
कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित 'एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय' या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रँकिंग पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एकमेव विजेते ठरले आहे.
महाविद्यालय परिसरातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व त्याचा वापर, हरित संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे के. जे. सोमैया महाविद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली आहे.
यादव म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी नियमित केली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन महाविद्यालयात विविध विभागांमार्फत उपक्रम राबवून साजरे केले जातात. महाविद्यालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून महाविद्यालयाच्या शेजारून वाहणार्या गोदावरी नदीकाठी असलेल्या वृक्षांना दिले जाते. महाविद्यालय व स्थानिक गोदामाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नदी किनारी 'अंबिका बन' निर्माण केले आहे. या उपक्रमाचे कौतुक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी स्वतः कार्यस्थळी येऊन केले होते. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी महाविद्यालयात ४ लाख लीटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत.
महाविद्यालयाच्या या अहवाल समितीचे सदस्य म्हणून उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, एन. एस. एस. जिल्हा समन्वयक प्रा. शैलेंद्र बनसोडे, एन. एस. एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. गायकवाड, बी. बी. ए. विभागप्रमुख प्रशांत भदाने, कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संजय दवंगे, संजय पाचोरे यांनी काम पाहिले. या यशाबाबत कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, व्यवस्थापन सदस्य संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयातील सर्वांचे कौतुक केले आहे.