केंद्र सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:04 AM2021-01-08T05:04:01+5:302021-01-08T05:04:01+5:30
श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा ...
श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली.
येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम आदमी पक्षाच्यावतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार कानडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे उपस्थित होते. तत्पूर्वी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सचिन गुजर, नागेश सावंत, सचिन बडदे, डॉ.महेश क्षीरसागर, योगेश बोर्डे, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी भेट देऊन शेतकऱ्यांना अभिवादन केले.
आमदार कानडे म्हणाले, ‘‘केंद्राकडून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा भास निर्माण केला जातो. बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळून अधिक भाव मिळेल, असे सांगितले जाते; मात्र शेतकऱ्यांना सरकारने फसविले आहे, हे लक्षात आल्याने अनेक संघटना एकत्र येऊन आंदोलन उभे राहिले. हे कायदे मागे घ्यावेत, यासाठी राजधानीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू झाले; मात्र त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. धमकावण्याचे प्रकार घडले; मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.’’
यावेळी राजेंद्र भोसले, शेतकरी संघटनेचे अहमद जागीरदार, यासीन सय्यद, नगरसेवक मुक्तार शहा, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, छावाचे नितीन पठारे, जोएफ जमादार, रियाज पठाण, अमरप्रीत सिंग, जीवन सुरडे, लहुजी सेनेचे हनीफ पठाण आदींनी अभिवादन केले.
----------
फोटो : ०४श्रीरामपूर कानडे अभिवादन
....
ओळी-दिल्लीतील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करताना आमदार लहू कानडे, तिलक डुंगरवाल आदी.
----------