शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतच प्रमाणपत्राची मुदत संपली; पात्रता पुन्हा सिद्ध करण्याची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:20 PM2020-02-16T13:20:20+5:302020-02-16T13:21:04+5:30
२०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नानासाहेब चेडे ।
दहिगावने : राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात येते. यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) सीटीईटी/टीईटी परीक्षा पास असावे लागते. या सीटीईटी/टीईटी प्रमाणपत्राची मुदत ७ वर्ष आहे. त्यामुळे २०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया एक ना अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. २०१० साली सीईटीद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यानंतर मात्र सरकार बदलले तसे शिक्षक भरतीचे नियमही बदलत गेले.
संस्था चालकांच्या भूमिकेनेही खलबते झाली. अशातच २०१० नंतर थेट २०१९ मध्ये (९ वर्षांनी) पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकभरतीचे चाक फिरले खरे, मात्र २०२० उजाडले तरीही भरती पूर्ण झालेली नाही. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या अभियोग्यता चाचणीतून मुलाखतीशिवाय शिक्षकांची सप्टेंबर २०१९ निवड यादी लागली. यातही अनेक विद्यार्थी निकषांची शर्यत पार करू न शकल्याने जागा रिक्त राहिल्या. तर मुलाखतीसह भरण्यात येणाºया जागांचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे दहा वर्षांपासूनची शिक्षक भरतीची प्रतीक्षा कायम असलेल्या विद्यार्थ्यांमधून पवित्र प्रणालीही अपवित्र ठरल्याची टीका होत आहे.
सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांची अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तेच सीटीईटी/टीईटी पात्रताधारक पुढील अभियोग्यता चाचणीसाठी अपात्र झाले आहेत. याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी फोनवर विचारणा केली असता हे वास्तव असले तरी याबाबत मला अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगत शासनाच्या मान्यतेशिवाय पुढील अभियोग्यता चाचणी होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
दरवर्षी शिक्षकभरती प्रक्रिया राबवली गेली असती तर सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता. २०१० नंतर २०२० मध्ये शिक्षकभरती होत आहे. अशातच सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची मुदत संपली म्हणून त्यांना अपात्र ठरवणे हा अन्याय आहे, असे महाराष्ट डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.