अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अनेक प्रश्न अनुत्तरीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:55+5:302021-05-16T04:19:55+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. आता दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल हे स्पष्ट नसताना सीईटीचा ...
अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. आता दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल हे स्पष्ट नसताना सीईटीचा विचार सुरू झाला आहे. परंतु सीईटीच घ्यायची तर मग परीक्षाच रद्द का केली? सीईटीला कोरोनाचा धोका नाही का? असे अनेक प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली. परंतु आता गुणपत्रिका कशा तयार करायच्या, जर गुणपत्रिका नसतील तर अकरावीचे प्रवेश कसे होणार, मेरिट कसे लागणार असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यावर शासनाचा विचार सुरू आहे. सध्या अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा विचार सुरू झाला आहे. परंतु एकीकडे दहावीचे अंतर्गत मूल्यमापन कसे होईल हे स्पष्ट नसताना सीईटी कशी घ्यावी, हा पेच आहे. सीईटी घ्यायची तर ती ऑनलाईन की ॲाफलाईन याबाबतही गोंधळ आहे. शिक्षकांचे स्पष्ट मत आहे की, कोरोनाचे प्रमाण वाढल्याने दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मग आता सीईटी परीक्षा घेताना कोरोनाची भीती नाही का? या परीक्षेदरम्यान विद्यार्थी बाधित झाले तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित करून शिक्षकांनी सीईटीला ही विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे काही शिक्षकांनी सीईटी घेण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले आहे. सीईटी घेतली तर त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सोपी जाईल, असे शिक्षकांचे मत आहे.
-----------
अकरावी प्रवेशाच्या नगर जिल्ह्यातील जागा - सुमारे ८० हजार
--------
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीनंतर तंत्रनिकेतन किंवा आयटीआय प्रवेशाचे निश्चित धोरण अद्याप शासनाने जाहीर केलेले नाही. पुढील प्रवेेशासाठी आता सीईटी घ्यायची की दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनातून गुण द्यायचे, याचा निर्णय झाल्यानंतर प्रवेशाचा गोंधळ मिटणार आहे.
-----------
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?
दहावीचे वर्ग काही महिने सुरू झाले होते. त्या काळात अनेक शाळांनी पूर्व परीक्षा घेतल्या. त्या आधारे अंतर्गत मूल्यमापन होऊ शकते. दुसरीकडे शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम घेतलेला आहे. त्या कामगिरीतून मुलांचे मूल्यमापन होऊ शकते, अशी शक्यता आहे. परंतु शासनाने अद्याप मूल्यमापनाचे निकष जाहीर केलेले नाहीत.
---------
सीईटी ऑनलाईन की ॲाफलाईन?
सीईटी झाली तर ती ऑनलाईन घेण्याकडे शासनाचा कल असू शकतो. मात्र यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होईल. कारण ग्रामीण भागात इंटरनेटची मोठी समस्या आहे.
---------
अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय चांगला आहे. जर मूल्यमापन झाले तर त्यातून गुणदान करता येईल. अंतर्गत मूल्यमापन होणार असेल तर सीईटी घेण्याची गरजच नाही.
- सुनील गाडगे, माध्यमिक शिक्षक
------------
बोर्डाची कमिटी नेमून दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करून सीईटी घेता येऊ शकते. सीईटीच्या गुणांमधूनच पुढील प्रवेशाचा प्रश्न सुटू शकतो. कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर सीईटी परीक्षा घेता येऊ शकते.
- महेश पाडेकर, उच्च माध्यमिक शिक्षक
----------
कोरोनाच्या काळात सीईटी परीक्षा हा पर्याय होऊ शकत नाही. अनेक शाळांनी मध्यंतरी शाळा सुरू झाल्यावर पूर्व परीक्षा घेतल्या आहेत. त्या आधारे किंवा शिक्षकांनी वर्षभर घेतलेल्या ॲानलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे १०० गुणांचे मूल्यांकन करून गुणपत्रिका तयार करता येऊ शकते.
- सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना