संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील पूल उभारण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात
By शेखर पानसरे | Published: February 2, 2024 03:24 PM2024-02-02T15:24:45+5:302024-02-02T15:25:28+5:30
पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील नवीन पूल उभारणीसाठी संगमनेर नगर पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. ०२) म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने तुटलेल्या पुलाजवळ समितीचे सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.
श्री स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरापर्यंत हा पूल होता. साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा आदी परिसर तसेच कासारा दुमाला आणि त्यापुढील गावांना हा पूल जोडतो. साई मंदिराच्या शेजारी दिगंबर गणेश सराफ विद्यालय आणि देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. प्रवरा, म्हाळुंगी नदीच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. मात्र, पूल खचल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांना दळणवळणाची मोठी अडचण होते आहे.
पुलाच्या कामाची निविदा ५ डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २५ जानेवारीला कार्यारंभ आदेश काढण्यात आला. नवीन पुलाचे उभारणीचे काम हे जोपर्यंत सध्या जुन्या तुटलेल्या पुलावर असलेली पाईपलाईन स्थलांतर करत नाही. तोपर्यंत तुटलेला पूल जमीनदोस्त करून नवीन पूल उभारणीचे काम सुरू करणे अशक्य असल्याचे नगर परिषद प्रशासनाला माहिती असूनही ही पाईपलाईन स्थलांतर कामाची निविदा १९ जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आली. या दोन्ही निविदा प्रसिद्ध करून पूर्ण करणे यातील वेळ वाया गेला आहे. असेही म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.