चाकणच्या प्रवाशाला जातेगाव शिवारात दोन लाखाला लुटले; आरोपीस अटक
By Admin | Published: May 7, 2017 01:18 PM2017-05-07T13:18:16+5:302017-05-07T13:39:57+5:30
चाकण येथून साडूच्या मुलाच्या लग्नास निघालेल्या कुटुंबाला नगर- पुणे महामार्गावर जातेगाव शिवारात चौघांनी २ लाख २० हजार रुपयांना लुटले़
आॅनलाइन लोकमत
पळवे (अहमदनगर), दि़ ७ - चाकण येथून साडूच्या मुलाच्या लग्नास निघालेल्या कुटुंबाला नगर- पुणे महामार्गावर जातेगाव शिवारात चौघांनी २ लाख २० हजार रुपयांना लुटले़ ही घटना रविवारी मध्यरात्री १़३० वाजण्याच्या सुमारास घडली़
सत्यवान विठ्ठल जाधवर (वय ४०, रा़ चाकण, मूळ रविवाशी हिंगणी खुर्द, बीड) हे पुणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वाहक म्हणून काम करीत आहेत़ शनिवारी काम संपल्यानंतर ते पत्नी चंद्रकला व मुलगी अस्मितासह चाकण येथून कुटुंबासह त्यांच्या साडूच्या मुलाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले होते़ रात्री ११़३० वाजता चाकण चौकात बसची वाट पाहत उभे असताना तवेरा (क्र. एम़ एच़ १४, डी़ ए़ २९७१) कार चालकाने जाधवर यांना नगरला सोडण्याची आॅफर दिली़ या गाडीत इतर चार प्रवाशी होते़ त्यामुळे जाधवरही या गाडीत कुटुंबासह बसले़ या गाडीतील प्रवाशांनी त्यांना बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, सुपा येथे उतरायचे आहे, असे जाधवर यांना सांगितले. गाडी शिरुर मार्गे नगरला निघाली असता ते गव्हाणवाडी येथे चहा पिण्यास थांबले़ पुढे पळवे परिसरातील जातेगाव घाट ओलांडल्यानंतर त्यांनी गाडी महामार्ग सोडून कच्च्या रस्त्याने वळवली़ त्यावेळी एका जणाला जातेगावला सोडायचे आहे, असे सांगितले़ गाडी महामार्गापासून एक कि़मी़ अंतरावर कच्या रस्त्याने जातेगाव रोडवर नेली. त्याच वेळी पाठीमागे बसलेल्या दोघांनी जाधवर यांची पत्नी चंद्रकला हीचा गळा आवळला व सत्यवान यांच्या हातातील १ तोळ्याचे ब्रासलेट व खिशातील वीस हजार काढून घेतले़ त्यानंतर चंद्रकला यांच्या गळ्यातील ४ तोळ्याचे मोठे गंठण, २ तोळ्याचे छोटे गंठण काढून घेतले़ त्यांची मुलगी अस्मिता ही पुढच्या सीटवर बसलेली होती़ आरोपींनी नंतर अस्मिताच्या गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची चैन दम देऊन काढून घेतली़ त्यावेळी जाधवर व आरोपींमध्ये झटापट झाली़
सत्यवान जाधवर यांनी गाडीच्या खाली उतरुन मोठा दगड चालकासमोरील काचेवर घातला व मोठमोठ्याने आरडाओरडा केला़ त्यामुळे या चौघांनी तवेरा गाडी तेथेच सोडून मुद्देमाल घेऊन पळ काढला़ हा आरडाओरडा ऐकून परिसरातील अविनाश ढोरमले, अक्षय पोटघन, अतिश ढोरमले, राहूल ढोरमले, दत्तात्रय ढोरमले हे नागरीक गाडीच्या दिशेने पळत आले़ त्यानंतर सत्यवान यांनी पोलिसांशी संपर्क केला़ वीस मिनिटात सुपा पोलीस निरिक्षक श्यामकांत सोमवंशी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
जाधवर यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ त्यानंतर रविवारी पहाटे ५.३० वाजता पोलीस निरीक्षक सोमवंशी, ठाणे अंमलदार सोमनाथ कांबळे, हेड कॉन्स्टेबल अजय नगरे, कॉन्स्टेबल ईश्वर भोसले, चालक राहूल सपाट हे फिर्यादी सत्यवान जाधवर यांना घेऊन आरोपींचा शोध घेऊ लागले़ म्हसणे फाटा येथे चौघांपैकी एक आरोपी सत्यवान यांनी ओळखला़ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ त्याने त्याचे नाव अशोक राजेंद्र तळेकर (वय २७, रा़ फुलसांगवी, ता़ शिरूर कासार, जि़ बीड) असे सांगितले़ गणेश गोविंद तळेकर (वय ३२, रा़ फुलसांगवी), बाबू मुंढे (वय २४, रा़ परळी) व अश्फाक (पूर्ण नाव माहित नाही़ रा़ पाटोदा) अशी अन्य तिघांची नाव आहेत़ हे आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी करीत आहेत़