तळेगाव चौफुलीवर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:59+5:302021-02-09T04:22:59+5:30
तळेगाव दिघे : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाल्याने, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी ...
तळेगाव दिघे : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाल्याने, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ८) तळेगाव चौफुलीवर एक तास रास्ता रोको आंदोलन छेडले. या रास्ता रोकोमुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
तळेगाव दिघे येथे शेतीसाठी दोन दिवसांतून केवळ आठ तासच वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतास पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे तळेगाव दिघे येथील शेतकरी आक्रमक व संतप्त झाले. या प्रश्नी आंदोलनाचे निवेदन देऊनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर रास्तारोको आंदोलन छेडले.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सचिन दिघे, अमोल बाळासाहेब दिघे, तात्यासाहेब दिघे, मच्छिंद्र दिघे, पंढरीनाथ इल्हे, गणेश दिघे, विकास गुरव, रवींद्र दिघे, पोपट दिघे, नामदेव दिघे, शिवाजी दिघे, गणपत दिघे, इसाक शेख, गोविंद कांदळकर, बापूसाहेब दिघे, संतोष डांगे, नवनाथ दिघे, बाळासाहेब दिघे, भानुदास दिघे, साहेबराव दिघे, शिवाजी सुपेकर, सीताराम दिघे, दगुभाई शेख, उत्तम दिघे, सुनील दिघे सहित पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाधव यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता, पुन्हा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच रमेश दिघे यांनी यावेळी दिला.
....
वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा
आंदोलनप्रसंगी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या रास्तारोको आंदोलनामुळे संगमनेर ते कोपरगाव व लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील वाहतूक तळेगाव दिघे चौफुलीदरम्यान ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.