सूत्रधारांचा शोध घेण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:23+5:302021-06-25T04:16:23+5:30
या दारूचा बाजारात पुरवठा करणारी गुन्ह्यातील साखळीही उजेडात आणावी लागणार आहे. बर्फाचा कारखाना असल्याचे भासवून त्याआड तेथे ही बनावट ...
या दारूचा बाजारात पुरवठा करणारी गुन्ह्यातील साखळीही उजेडात आणावी लागणार आहे. बर्फाचा कारखाना असल्याचे भासवून त्याआड तेथे ही बनावट दारूनिर्मिती केली जात होती. तब्बल साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त करण्यात आला होता. या कारवाईत नगर, श्रीरामपूर व कोपरगाव येथील उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यात शहेबाज युनूस पटेल (२९) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मात्र, आता पुढील कार्यवाहीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. शहराच्या लोकवस्तीच्या भागात हा धंदा गेली अनेक दिवस बिनदिक्कतपणे सुरू होता, हे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार सुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हा अवैध व्यवसाय संघटितरित्या केला जात होता. बनावट दारूसाठी लागणारे स्पिरीट, बुचे, बाटल्या, कृत्रिम स्वाद पदार्थ मिळून आले आहेत. त्यामुळे या सर्व वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचा शोध घ्यावा लागणार आहे. बनावट दारूची बाजारात विक्री करताना त्यात आणखी काही गुन्हेगार सहभागी झाले असण्याची शक्यता आहे. त्यांच्यापर्यंत उत्पादन शुल्क विभाग पोहोचणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
--------
बनावट दारूच्या कारखान्याच्या जागा मालकावर काय कारवाई झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. उत्पादन शुल्कचे येथील निरीक्षक बी. बी. हुलगे यांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ठोस माहिती हाती लागल्यानंतर कळविले जाईल, असे सांगितले.
-------