नव्या पदाधिकाऱ्यांपुढे कारभार चालविण्याचे आव्हान
By Admin | Published: October 5, 2014 11:50 PM2014-10-05T23:50:23+5:302014-10-05T23:55:53+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. उर्वरित दोन सभापतींचीही निवड झाली असून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या समित्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. या नवीन पदाधिकाऱ्यांत उपाध्यक्ष अण्णा शेलार वगळता अन्य पदाधिकारी हे नवखे आहेत. यामुळे त्यांच्या पुढे पुढील अडीच वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा चालविण्याचे आवाहन आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड ह्या पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या असून पहिल्याच संधीत त्यांना अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे. यापूर्वीच्या अडीच वर्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात क्वचित प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. या परिस्थितीत त्यांना आता जिल्हा परिषदेत त्यांना अध्यक्षांची खडतर भूमिका बजवावी लागणार आहे. अन्य वेळी ज्येष्ठ सदस्य, प्रतोद यांच्याशी सल्ला-मसलत करून निर्णय घेता येतात. मात्र, सभागृहात व्यासपीठावर बसून सर्व बाजुंचा विचार करून त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. हा काळ त्यांच्यासाठी खडतर ठरणार आहे.
उपाध्यक्ष शेलार यांना उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे. यामुळे त्यांची अडचण राहणार नाही. मात्र, अध्यक्ष गुंड यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. याशिवाय त्यांच्याकडे शिक्षण आणि आरोग्य हे दोन मोठे विभाग असून त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासोबतच या विभागांना पुढे नेण्याचे काम करावे लागणार आहे.
चारही विषय समितीचे सभापती हे नवखे आहेत. यात नंदा वारे, मीना चकोर, बाबासाहेब दिघे आणि शरद नवले यांचा समावेश आहे. गत अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या सभागृहात नवले, दिघे आणि चकोर चर्चा करताना दिसले. वारे यांच्याकडे महिला बालकल्याण सारखा मोठा विभाग असून यात अंगणवाड्या, गरोदर माता, स्त्री जन्मदर आणि कुपोषण मुक्ती या कार्यक्रमांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)