चांभुर्डी, उखलगाव सोसायटीचे सचिवपद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:38+5:302021-05-30T04:18:38+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव व विठ्ठल चांभुर्डी सेवा सोसायटीचे सचिव मिलिंद पवार यांचे एप्रिलमध्ये निधन झाले. मात्र त्यानंतर ...

Chambhurdi, Ukhalgaon Society's post is vacant | चांभुर्डी, उखलगाव सोसायटीचे सचिवपद रिक्त

चांभुर्डी, उखलगाव सोसायटीचे सचिवपद रिक्त

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव व विठ्ठल चांभुर्डी सेवा सोसायटीचे सचिव मिलिंद पवार यांचे एप्रिलमध्ये निधन झाले. मात्र त्यानंतर या संस्थांचा कारभार पाहण्यासाठी सचिव उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण ठप्प झाले आहे.

मार्चअखेरीस सभासद शेतकऱ्यांनी उसनवारी करून पीककर्ज व खावटी कर्जाचा भरणा केला. एप्रिल महिन्यात नवीन कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळून आपले व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत चालू होतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पुढे सचिव न मिळाल्याने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे रखडली आहेत. मार्चअखेर जुन्या कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज घेतले तर व्याजात सवलत मिळेल. आपले व्यवहारही सुरळीत होतील अशी शेतकऱ्यांना अशा असते. त्यासाठी कोरोनाचे संकट असताना काही दिवसांपुरते लोकांनी उसनवारी व पाहुण्या रावळ्यांकडून पैसे घेतले. महिनाभर वाट पाहून देणेकऱ्यांनी तगादा लावल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही सचिवांना अधिकचा भार दिला तर त्यांच्याकडे अगोदरच तीन चार सोसायट्यांची जबाबदारी असल्याने नवीन जबाबदारी घ्यायला कोणताही सचिव तयार होत नाही. अगोदरच सचिव संख्या कमी असल्याने या संस्थांची जबाबदारी कोणाकडे द्यायची ही सहायक निबंधक सहकारी संस्था यांची डोकेदुखी झालेली आहे. या संस्थेच्या आर्थिक वर्षातील माहिती तयार करण्याचे काम रखडले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर विठ्ठल सेवा सोसायटी व उखलगाव सेवा सोसायटीला सचिव नेमावा, अशी मागणी केली जात आहे.

---

विठ्ठल चांभुर्डी व उखलगाव सेवा संस्थेच्या सचिवाचे निधन झाल्याने या संस्थेच्या कामकाजात अडचणी निर्माण झाल्या. सचिवांची संख्या कमी असल्याने लगेच नवीन सचिव देणे शक्य नसल्याने शेजारच्या सचिवांना या संस्थेचे कामकाज पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सचिवांवर कामकाजाचा बोजा वाढलेला आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आठवडाभरात नवीन सचिवांची नेमणूक करण्याचा प्रयत्न आहे. नवीन सचिव नेमण्याचे सेवा संस्थांना अधिकार दिलेले आहेत. त्यांनी यापुढे सचिवांचे बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा.

-रावसाहेब खेडकर,

सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा

Web Title: Chambhurdi, Ukhalgaon Society's post is vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.