अहमदनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

By साहेबराव नरसाळे | Published: April 29, 2023 02:04 PM2023-04-29T14:04:38+5:302023-04-29T14:05:12+5:30

नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Chance of rain with stormy wind for next four days in Ahmednagar district | अहमदनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अहमदनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

साहेबराव नरसाळे, अहमदनगर : भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात २९ एप्रिल ते २ मे या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, गारपीट व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वारा व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन- आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 किंवा 2356940 वर संपर्क साधावा. असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Web Title: Chance of rain with stormy wind for next four days in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.