चाँदबिबीच्या विश्रामगृहाचे झाले खंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 09:59 PM2017-09-25T21:59:17+5:302017-09-25T22:03:44+5:30

साहेबराव नरसाळे अहमदनगर : चहूबाजूंनी वाढलेले गवत, खुरट्या झाडांचा वेढा, पडलेल्या भिंती, ढासळलेले घुमट, मद्याच्या बाटल्यांचा खच आणि पावसाचे ...

Chandrabali's lodging room was destroyed | चाँदबिबीच्या विश्रामगृहाचे झाले खंडर

चाँदबिबीच्या विश्रामगृहाचे झाले खंडर

ठळक मुद्देआठ भागात ही वास्तू विखुरलेली असून, बागेतच अष्टकोनी महल बांधण्यात आला आहे.ही बाग गुलाबपुष्पांनी नटलेली असायची. हुसैन निजामशहा यांची मुलगी चाँद सुलताना यांचे विश्रांतिस्थान व हमामखाना (अंघोळीचे ठिकाण) होते.जेथे एकेकाळी गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता, त्या हमामखान्यात आता उग्र दुर्गंधी पसरलेली आहे.

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : चहूबाजूंनी वाढलेले गवत, खुरट्या झाडांचा वेढा, पडलेल्या भिंती, ढासळलेले घुमट, मद्याच्या बाटल्यांचा खच आणि पावसाचे साचलेले डबके अशी भग्नावस्था झाली आहे, हस्त बेहस्तबाग महल या अहमदनगरमधील दुस-या क्रमांकांच्या ऐतिहासिक वास्तूची!
अहमदनगरच्या इतिहासात पहिल्या क्रमांकाची वास्तू म्हणून भुईकोट किल्ल्याकडे पाहिले जाते़ त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो हस्त बेहस्त बाग महालाचा. अहमद निजामशाह यांनी १५०६ मध्ये ही दुमजली ऐतिहासिक वास्तू उभारली़ ही वास्तू फैजबक्ष महल म्हणून ओळखली जात होती़ पुढे या महालाला हस्त बेहस्त बाग म्हणून ओळखले जाऊ लागले़ आता त्याचाही अपभ्रंश करीत भिस्तबाग महाल नावाने ही वास्तू ओळखली जात आहे.
आठ भागात ही वास्तू विखुरलेली असून, बागेतच अष्टकोनी महल बांधण्यात आला आहे. या महालाभोवती पूर्वी चहूबाजूंनी जलाशय होता. या जलाशयात पिंपळगाव माळवी येथील तलावातून खापरी नळाद्वारे पाणी आणण्यात आले होते. ही बाग गुलाबपुष्पांनी नटलेली असायची. ही वास्तू हुसैन निजामशहा यांची मुलगी चाँद सुलताना यांचे विश्रांतिस्थान व हमामखाना (अंघोळीचे ठिकाण) होते.
विजापूरनंतरचे दुसरे सौंदर्यस्थळ असा दर्जा या वास्तूला लाभला होता़ मात्र, ही वास्तू आता पूर्णपणे ढासळली आहे़ जुगारी, मद्यपींचा अड्डा झाली आहे. महालातील गुलाबपुष्पांनी नटलेला जलाशय आता पावसाचे पाणी साचून गटार झाला आहे़ त्यात विविध प्रकाराची खुरटी झाडे उगवली असून, संपूर्ण महालाला गवताने वेढले आहे़ प्रवेशद्वाराच्या सर्वच भिंती ढासळलेल्या असून, छत केव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था आहे़ जेथे एकेकाळी गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता, त्या हमामखान्यात आता उग्र दुर्गंधी पसरलेली आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़

हे करता येईल...
बेहस्तबाग महालाचे पुनरुज्जीवन करून येथे पूर्वीसारखाच सुंदर जलाशय, त्यात नौकानयन, गुलाबपुष्पांसह इतर सुंदर फुलांनी युक्त असा बगीचा, लेझर शो करून हे ऐतिहासिक स्थळ उजागर करता येऊ शकेल़ महापालिकेला किंवा संबंधित यंत्रणेला त्यातून मोठा महसूल मिळवता येईल़ मात्र, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे़

प्रशासनाने केले हात वर
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपमंडळ नगरमध्ये आहे़ मात्र, या कार्यालयाकडे या ऐतिहासिक वास्तूची नोंदच उपलब्ध नाही़ ते आमच्याकडे नाही, असे सांगत पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली आहे़ तर जिल्हा प्रशासनानेही या जागेचा वाद पुढे रेटत तेथे विकास करणे अशक्य असल्याचे सांगितले़

जागेचा वाद कोर्टात
बेहस्त बाग महल ही ऐतिहासिक वास्तू खासगी जागेत असल्याचा दावा करीत हा वाद कोर्टात गेला आहे़ तर काही मंडळींनी ही ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे ती पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करावी, अशी मागणी केली आहे़ मात्र, याबाबत अद्याप कोर्टातून निर्णय झालेला नाही़ त्यामुळे शहराच्या ५२८ वर्षांच्या इतिहासात या ऐतिहासिक वास्तूचा कोणताही विकास आराखडा तयार होऊ शकला नाही़

बेहस्त बाग महालाची डागडुजी करून तेथे विकास झाला पाहिजे, अन्यथा पुढील पिढ्यांना बेहस्त बाग महाल फक्त छायाचित्रांमध्येच पाहावा लागेल़ अहमदनगरचे हे सौंदर्य नष्ट होत आहे़ ते वाचविण्यासाठी समाजाची एकजूट होणे आवश्यक आहे़
-जयंत येलूलकर

पर्यटनाच्या दृष्टीने अहमदनगरमधील ऐतिहासिक स्थळांचा विकास होणे गरजेचे होते़ मात्र, दुर्दैवाने ते झाले नाही़ हा ऐतिहासिक खजिना ज्याला पाहिजे त्याने तसा लुटला आहे, याची ना प्रशासनाला खंत, ना राजकारण्यांना! बेहस्तबाग महालाचा विकास करून पर्यटनस्थळ केल्यास महापालिकेला किंवा संबंधित यंत्रणेला मोठा महसूल मिळू शकेल़ पर्यटकांची संख्या वाढेल़ मात्र ती दूरदृष्टी असलेला अधिकारी किंवा राजकारणी येथे नाही़
-नवनाथ वाव्हळ, इतिहास संशोधक

Web Title: Chandrabali's lodging room was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.