चांदबिबी, शहाजहान यांचे विश्रामगृह ढासळतेय : फराहबक्ष महलाची दुरवस्था
By साहेबराव नरसाळे | Published: October 1, 2017 11:27 AM2017-10-01T11:27:45+5:302017-10-01T11:34:15+5:30
शहाजहान यांना याच वास्तूने ताजमहालाची प्रेरणा दिली, त्यामुळे १६३२ मध्ये शहाजहानने ताजमहाल उभारला. अशी अत्यंत देखणी फराहबक्ष महल वास्तू आता अखेरच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे घुमट ढासळले आहेत, कमानी पडल्या आहेत.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : ताजमहालाची प्रेरणा ज्या वास्तूवरुन घेतली गेली ती वास्तू म्हणजे अहमदनगरमधील फराहबक्ष महल! चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी अष्टकोनात उभारलेली आहे. गुलाबी रंगाच्या या वास्तूला आता ४३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे़ मात्र, सद्यस्थितीत ही वास्तू चहुबाजूंनी ढासळू लागली आहे. पर्यटकांसाठी ती धोकादायक बनत आहे.
हिरव्यागार वनराईने नटलेला परिसर आणि वास्तूच्या चहूबाजूंनी पाणी, त्यात कारंजे अशा पद्धतीने या वास्तूचे बांधकाम मुर्तझा निजामशाह यांनी १५७६ ते १५८३ या काळात पूर्ण केले़ सलाबतखानाच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक एकर जागेवर ही प्रशस्त, सुंदर अष्टकोनी वास्तू उभी राहिली़ फराहबाग, फराहबक्ष महल, फरद महल अशा नावाने ही इमारत ओळखली जाते़ ही इमारत तीन मजली असून घुमट, उंच कमानी, मोठी गवाक्षे (खिडक्या) आणि महालाच्या मध्यभागी रंगमहाल अशी या वास्तूची रचना आहे़ अप्रतिम सौंदर्य आणि उत्तम हवा यामुळे या वास्तूचं नाव ‘फराहबक्ष’ म्हणजे ‘सुख देणारा महाल’ असं ठेवलं गेलं असावं, असं इतिहास तज्ज्ञाचं मत आहे़ वास्तूच्या मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून शहापूर आणि कापूरवाडी जलाशयातून खापरी नळाने पाणी आणून येथील कारंजा फुलविण्यात आला होता़ या कारंजाभोवती सुंदर सुवासिक फुलांचा बगिचा होता़ या फुलांच्या सुगंधाने महल भारलेला असायचा़ अशा भारलेल्या वातावरणात मैफली रंगायच्या. या महालात चाँदबिबी, सदाशिवरावभाऊ, अकबरपुत्र मुराद, बादशहा शहाजहान यांनी वास्तव्य केलं.
शहाजहान यांना याच वास्तूने ताजमहालाची प्रेरणा दिली, त्यामुळे १६३२ मध्ये शहाजहानने ताजमहाल उभारला, असेही सांगितले जाते़ अशी अत्यंत देखणी फराहबक्ष महल वास्तू आता अखेरच्या घटका मोजत आहे़ या वास्तूचे घुमट ढासळले आहेत, कमानी पडल्या आहेत. काही ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने वीट बांधकाम करुन आधार दिला आहे़ मात्र, हा आधार कुचकामी ठरत असल्याचे तेथील पडझडीवरुन लक्षात येते़ मागील बाजूने पाहिल्यास ही इमारत केव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.
फराहबक्ष महलाच्या बाहेर महालाबाबत माहिती देणारी कोनशिला उभारण्यात आली आहे. मात्र, ही कोनशिलाही तुटली आहे. येथील स्वच्छतेसाठी भारतीय पुरातत्व विभागाने एक कर्मचारी नियुक्त केला आहे़ या कर्मचा-याकडून नियमित स्वच्छता होत आहे़ मात्र, डागडुजीकडे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे इतिहासप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हा महल कोसळण्याच्या अवस्थेत असल्यामुळे तेथील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. या वास्तूची आतील रचना पाहण्यासारखी आहे. मात्र, भीतीपोटी आतमध्ये जाण्याचे पर्यटक टाळतात़ अनेक शाळा, महाविद्यालयांच्या सहली आजही फराहबक्ष महलला भेट देत आहेत. मात्र, सुविधेअभावी पर्यटक नाराज होऊन परतात.
हे करता येईल..
फराहबक्ष महलाची डागडुजी करुन तो पर्यटकांना फिरण्यासाठी सुरक्षित केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल़ या महालात चाँदबिबी, सदाशिवरावभाऊ, अकबरपुत्र मुरार, बादशहा शहाजहाँन अशा महनीय व्यक्तींविषयी माहिती उपलब्ध करुन देता येईल. भारतीय सैन्याच्या टँक म्युझियमला दरवर्षी ६० हजार पर्यटक भेट देतात. मात्र, हे पर्यटक फराहबक्ष महालाकडे वळत नाहीत. हे पर्यटक तिकडे वळविण्यासाठी पायाभूत सुविधा असाव्यात. तेथील जलाशयात पाणी भरुन पुन्हा नौकानयन सुरु करता येईल. सुंदर, सुवासिक फुलांची बाग उभी करता येईल. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल आणि महसूलही प्रशासनाला उभा करता येईल.